स्वयंपुनर्विकास शहरांचा चेहरामोहरा बदलेल ः पवार

स्वयंपुनर्विकासातून सर्वसामान्य माणसाला मोठी जागा मिळेलच, पण मोठ्या शहरांचा चेहरामोहरा बदलण्याची ताकद या संकल्पनेत आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं-समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी आज शरद पवार यांची ‘सिल्व्हर ओक’ येथे भेट घेतली आणि स्वयंपुनर्विकास संकल्पनेची माहिती दिली. पवार यांनी या योजनेतील सर्व बारकावे जाणून घेतले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, प्रसाद लाड उपस्थित होते. या योजनेसाठी मोठा निधी उभारावा लागेल. एलआयसी आणि इतर मोठ्या महामंडळांकडून निधी उभारणीसाठी प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी दिल्लीत बैठक घेऊ, असे यावेळी पवार यांनी सांगितले.