सरकार स्थापन करून अस्थिरता संपवा! शरद पवार यांचे महायुतीला आवाहन

sharad-pawar-new

महाराष्ट्र देशातील सर्वात मोठे राज्य आहे, पण या महाराष्ट्रात सध्या अस्थिरता निर्माण झालेली आहे.  विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप महायुतीला बहुमत मिळालेले आहे. त्यामुळे महायुतीने राज्यात सरकार स्थापन करून महाराष्ट्राला स्थिरता द्यावी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केले.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शरद पवार यांची त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यानंतर शरद पवार पत्रकारांशी बोलत होते. राज्यात सध्याच्या परिस्थितीतून मार्ग काढावा अशी रामदास आठवले व माझीही इच्छा आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत मार्ग काढण्यासाठी तुम्ही सल्ला देऊ शकतात का अशी विचारणा करण्यासाठी रामदास आठवले माझ्याकडे आले होते असे पवार यांनी स्पष्ट केले.

राज्यात निर्माण झालेली राजकीय कोंडी कधी फुटणार असा प्रश्न पत्रकारांनी शरद पवार यांना केला असता ते म्हणाले की, राज्यपालांनी सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला सत्तास्थापनेसाठी आमंत्रित करायल पाहिजे होते. राज्यात महायुतीने समंजसपणा दाखवून सरकार स्थापन करावे व महाराष्ट्रातील अस्थिरता संपवावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले. शिवसेनेने संपर्क साधला असता तर राष्ट्रवादी काँग्रेस पाठिंबा देणार का या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले की, सरकार स्थापन करण्याची महायुतीची जबाबदारी आहे. आमच्याकडे बहुमत असते तर आम्ही सत्तास्थापनेचा दावा केला असता असे ते म्हणाले.

काही तरी घडले असेल

शिवसेना-भाजपमधील पन्नास-पन्नास टक्के जागावाटपाच्या सूत्राच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाबाबत उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, ज्या अर्थी जबाबदार लोक त्याबाबत सांगतात त्या अर्थी काही तरी घडले असण्याची शक्यता असेल. पण माझ्याकडे त्याबाबतची अधिकृत माहिती नाही, असेही ते सांगण्यास विसरले नाहीत.

राज्यपालांच्या निर्णयाकडे काँग्रेसचे लक्ष

महाराष्ट्रात सत्तास्थापनेवरून निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीला केवळ भाजपच जबाबदार आहे. आता या अभूतपूर्व राजकीय परिस्थितीबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे काय निर्णय घेतात याकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

प्रसारमाध्यमांशी बोलताना राज्यातील या परिस्थितीला भाजपच जबाबदार असल्याचा आरोप बाळासाहेब थोरात यांनी केला. शरद पवार हे ज्येष्ठ अनुभवी नेते असून आम्ही त्यांचे सतत मार्गदर्शन घेत असतो. या बैठकीत अशा प्रकारच्या यापूर्वीच्या घटनांची पवार यांनी आम्हास माहिती दिली. भाजपने जनादेश पाळला पाहिजे होता. सरकार स्थापन करण्याची त्यांची जबाबदारी होती, असे थोरात म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या