आगामी निवडणुका तिन्ही पक्षांनी एकत्रित लढवाव्यात, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत चर्चा

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचीही बैठक आज यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पार पडली. या बैठकीत आगामी निवडणुका तिन्ही पक्षांनी एकत्रित येऊन लढविण्याबाबत चर्चा झाली, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिली.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व मंत्री व खासदारांची ही बैठक पार पडली. या बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माहिती दिली. ते म्हणाले, खासदार, मंत्री, आमदार यांना स्थानिक पातळीवर महाविकास आघाडी निवडणुकांसाठी एकत्र कसे येईल हे पाहण्याबाबत या बैठकीत विचारविनिमय करण्यात आला. त्याचप्रमाणे ओबीसी आरक्षण मिळावे ही महाविकास आघाडीची भूमिका होती असे सांगतानाच याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच निर्णय घेतील, असेही जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले.