मुंबई पोलिसांवर 100 टक्के विश्वास – शरद पवार

1568
शरद पवार – 1) 18 जुलै, 1978 ते 17 फेब्रुवारी, 1980 (पुलोद), 2) 26 जून, 1988 ते 25 जून 1991 (काँग्रेस), 3) 6 मार्च, 1993 ते 14 मार्च, 1995 (काँग्रेस)

सुशांतसिंह राजपूतसारख्या एका कलाकाराने आत्महत्या केली हे दुर्दैवीच आहे, पण गेल्या काही दिवसांत वीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्याची मीडियाने साधी दखलही घेतली नाही याचे आश्चर्य वाटते, अशा शब्दांत शरद पवार यांनी या प्रकरणावरून सुरू असलेल्या मीडिया ट्रायलबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. या प्रकरणाच्या तपासाबाबत बोलताना ते म्हणाले की, मुंबई पोलिसांना मी पन्नास वर्षे ओखळतो. त्यांच्यावर आणि त्यांच्या तपास कामावर माझा 100 टक्के विश्वास आहे.

नरीमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक होती. या बैठकीनंतर शरद पवार यांनी प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. पत्रकारांनी या वेळी अभिनेता सुशांतिंसह राजपूत आत्महत्या प्रकरण व सीबीआय चौकशीवर प्रश्न विचारले तेव्हा ते म्हणाले की, सुशांतिंसह राजपूत आत्महत्या प्रकरण चर्चा करण्याचा विषय नाही असे त्यांनी सुरवातीलाच स्पष्ट केले. मात्र त्यांनी या वेळी सातारा जिल्ह्यातील दौऱ्यात आलेला अनुभव पत्रकारांना सांगितला. ते म्हणाले की, दौNयात असताना एका शेतकऱ्याने माझा हात धरला. एक कलाकाराने आत्महत्या केली ते दुर्दैवी आहे. पण जिल्ह्यात वीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्याची नोंद घेतली नाही असे त्या शेतकऱ्याने मला सांगितले. यावर अधिक भाष्य करताना शरद पवार पुढे म्हणाले की, कलाकाराने आत्महत्या केल्यावर दु:ख होते. पण त्याची ज्या पद्धतीने मीडियात चर्चा होते त्याबद्दल आश्चर्य वाटते, असेही पवार म्हणाले.

पोलिसांवर 100 टक्के विश्वास

सुशांतिंसह राजपूत आत्महत्या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी होत आहे याकडे शरद पवार यांचे लक्ष वेधले असता, महाराष्ट्र व मुंबई पोलिसांना मी पन्नास वर्षे ओळखतो. माझा त्यांच्यावर 100 टक्के विश्वास आहे. पण तरीही सीबीआय किंवा इतर यंत्रणेने तपास करावा असे कोणाला वाटत असेल तर मी त्याला विरोध करणार नाही. चौकशी कोणी करायची हा राज्य सरकार व सीबीआयचा प्रश्न आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पवार कुटुंबात कोणतेही वाद नाहीत – जयंत पाटील

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी शरद पवार यांची सिल्व्हर ओक निवासस्थानी भेट घेतली. या भेटीवेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हेही उपस्थित होते. या भेटीनंतर विविध तर्कवितर्क मांडले जात असतानाच याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खुलासा केला. ही भेट पूर्वनियोजितच होती. अजितदादा अजिबात दुखावलेले नाहीत. पवार कुटुंब वा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यात कोणताही वाद नसल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. विरोधक जे काही बोलत आहेत ते आता त्यांच्या हातात कोणतेच कोलीत उरले नाही म्हणून बोलत आहेत. पार्थ नेमके काय म्हणाले मला माहिती नाही. प्रत्येकाने मते मांडायची असतात. मते मांडायचे स्वातंत्र्य प्रत्येकाला असते असेही जयंत पाटील म्हणाले.

पार्थच्या बोलण्याला काडीचीही किंमत नाही

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांनीही सुशांतिंसह राजपूत आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे, याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता, पार्थ पवार इमॅच्युअर आहे. माझ्या नातवाच्या बोलण्याला मी काडीचीही किंमत देत नाही. या प्रकरणात कोणी कोणावर काय आरोप केले याच्या खोलात जायचे नसल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या