भाईगिरी-गुन्हेगारी प्रवृत्तीला कायद्याचा धाक नसणं हे गृहमंत्र्यांचंच अपयश, नेरळमधील घटनेवरून राष्ट्रवादीने फटकारले

कर्जतचे मिंधे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या बॉडीगार्डने भर रस्त्यात एका व्यक्तीला दांडक्याने बेदम मारहाण केल्याचे समोर आले आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावरून सध्या मिंधे भाजप सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने देखील यावरून सत्ताधाऱी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. ” महाराष्ट्रात काय चाललंय काय? कुठे गोळीबार होतोय, कुठे कोयत्याने हल्ला तर कुठे राजरोसपणे मारहाण. राज्यात भाईगिरी-गुन्हेगारी प्रवृत्तीला कायद्याचा धाक नसणं हे गृहमंत्र्यांचंच अपयश आहे’, अशी टीका राष्ट्रवादीने केली आहे.

मिंधे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या बॉडीगार्डकडून नेरळ येथे एका व्यक्तीला बेदम मारहाण करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत थोरवे यांचा बॉडिगार्ड असलेला शिवा नावाचा व्यक्ती एका कारमधील व्यक्तीला हातातील दांड्याने मारहाण करताना दिसत आहे. त्या गाडीत त्या व्यक्तीची बायको व मुलं देखील होती व त्यांचे रडण्याचे किंचाळण्याचे आवाज देखील ऐकू येत आहेत.