कश्मीरची परिस्थिती चिंताजनक, संवाद आवश्यक – शदर पवार

36

सामना प्रतिनिधी । नागपूर

कश्मीरची परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे. या संवेदनशील विषयावर कुठलेही राजकारण न करता सरकारने कश्मिरी घटकांशी चर्चा सुरू केली पाहिजे, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी नागपुरात मांडले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या षष्ट्यब्दीपूर्ती सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने पवार नागपुरात आले होते.

माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी बोलताना पवार यांनी कश्मीरच्या समस्येवर आपले परखड मत मांडले. माजी पंतप्रधान वाजपेयी यांनी कश्मीरचा प्रश्न हाताळताना तेथील महत्त्वाच्या घटकांशी चर्चा सुरू केली होती. त्यामुळे तेथील वातावरण शांत झाले होते. गेल्यावर्षी पंतप्रधान मोदी यांचा दिवाळीच्या काळातील कश्मीर दौरा तेथे शांतता निर्माण करण्यात फायदेशीर ठरला होता. मात्र, सध्याचे वातावरण चिंताजनक आहे.

अलिकडे पार पडलेल्या तेथील निवडणुकांमध्ये केवळ सात टक्केच मतदान झाले. तेथील सामान्य माणूस लोकशाहीपासून दूर जात आहे. त्यामुळे सरकारने चर्चा सुरू केली पाहिजे. तेथील सर्वसामान्य लोकांना पाकिस्तान नको आहे. जे काही चित्र मांडले जातेय, ते काहीसे अतिरंजित आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी कुठलेही राजकारण न आणता सहकार्य करण्याची आमची तयारी असल्याचे पवार म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या