शरद पवार यांचा एमसीए अध्यक्षपदाचा राजीनामा

56
फोटो: पीटीआय

 

क्रीडा प्रतिनिधी

मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईत एमसीए कार्यकारिणीची बैठक बोलावून आपला अध्यक्षपदाचा राजीनामा व्यवस्थापकीय समितीकडे सोपविला.

हिंदुस्थानी क्रिकेट नियामक मंडळाने न्यायमूर्ती लोढा समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी कशी करावी याचा निर्णय आता न्यायालयालाच घेऊ दे, असेही पवार यांनी यावेळी सांगितले. पवार यांचा राजीनामा स्वीकारावा की नाही याबाबतचा अंतिम निर्णय एमसीए कार्यकारिणीच्या पुढील आठवड्यात होणार्‍या बैठकीत घेतला जाणार आहे. न्यायालयाचा आदर करून निर्णय सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या माजी न्यायमूर्ती आर. एम. लोढा पॅनेलने देशाच्या क्रिकेट प्रशासनात ७० वर्षे अथवा त्याहून वयाने मोठी व्यक्ती पदाधिकारीपदी असू नये अशी शिफारस बीसीसीआयला केली होती. त्यानुसार पवार यांनी एमसीए अध्यक्षपदाचा त्याग केल्याचे स्पष्ट झाले आहे. न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करणे प्रत्येक हिंदुस्थानी नागरिकाचे कर्तव्य आहे. त्यामुळेच लोढा शिफारशीबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची अधिक चिकित्सा न करता मी तो मान्य करतो व त्याची पूर्तता करण्यात मला आनंद आहे, असे पवार यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे. – मुंबई क्रिकेट असोसिएशनचे संयुक्त सचिव डॉ. पी. व्ही. शेट्टी यांनी, माजी आयसीसी व बीसीसीआय अध्यक्ष शरद पवार यांनी एमसीए अध्यक्षपदाचा राजीनामा शनिवारी असोसिएशनची बैठक बोलावून दिल्याचे सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या