धोनीचं नाव सचिन तेंडुलकरने सुचवलं होतं! शरद पवारांनी सांगितला किस्सा

हिंदुस्थानी संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून नावाजला गेलेला महेंद्रसिंह धोनी ( MS Dhoni ) याच्याकडे संघाचे नेतृत्व मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ( Sachin Tendulkar ) याच्यामुळे आले होते अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. झारखंडमध्ये झालेल्या एका जाहीर सभेमध्ये त्यांनी हा किस्सा सांगितला.

या सगळ्या घटना 2007 साली झाल्या होत्या. त्यावेळचा कर्णधार राहुल द्रविड याने आपल्याला कर्णधारपद सोडायचे असल्याचे सांगितले होते. त्याने कर्णधारपद सोडल्यास सचिन तेंडुलकर याने संघाचे नेतृत्व करावे असा बीसीसीआयच्या बहुतेक जणांचा आग्रह होता.

शरद पवार हे 2005 ते 2008 या काळात बीसीसीआयचे अध्यक्ष होते. या काळात घडलेल्या नाट्यमय घडामोडी त्यांनी उलगडून सांगितल्या. ते म्हणाले की “2007 साली हिंदुस्थानी क्रिकेट संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी राहुल द्रविड हा कर्णधार होता. मी तेव्हा इंग्लडमध्ये होतो आणि एकेदिवशी द्रविड माझ्याकडे आला आणि त्याने फलंदाजीवर परिणाम होत असल्याने कर्णधारपद सोडायचे असल्याचे सांगितले. आपल्याला या जबाबदारीतून मुक्त करावे असे द्रविड म्हणाला होता. मी सचिन तेंडुलकर याला संघाचे नेतृत्व करण्याबाबत विचारणा केली होती, मात्र त्याने नकार दिला होता” जर द्रविड आणि तेंडुलकर या दोघांनीही कर्णधारपद स्वीकारण्यास नकार दिला तर कसे होणार असा प्रश्न पवार यांना पडला होता. त्यांनी तो तेंडुलकर याला बोलूनही दाखवला होता. यावर तेंडुलकरने आपल्या संघात एक खेळाडू आहे जो संघाचे नेतृत्व करू शकतो असे आपल्याला सांगितले होते असे पवार म्हणाले. या क्रिकेटपटूचं नाव महेंद्रसिंह धोनी होतं असं त्यांनी सांगितले.

2007 सालच्या विश्वचषक स्पर्धेत हिंदुस्थानी संघ साखळी स्पर्धेतच बाद झाला होता. यामुळे संघावर आणि संघ नेतृत्वावर बरीच टीका करण्यात आली होती. त्याच वर्षी धोनीची T20 विश्वचषक स्पर्धेसाठी कर्णधार म्हणून निवड करण्यात आली. ही निवड सार्थ ठरवत त्याने हिंदुस्थानला हा विश्वचषक मिळवून दिला होता. त्यानंतर त्याने 2011 साली हिंदुस्थानला दुसऱ्यांदा विश्वचषकही जिंकून दिला. 2013 साली धोनीने चॅम्पिअन्स ट्रॉफीही जिंकून दिली. या तीनही स्पर्धेचं अजिंक्यपद मिळवून देणारा धोनी हा आतापर्यंतचा एकमात्र कर्णधार आहे. 2014 साली धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली होती तर 2020 साली त्याने क्रिकेटच्या इतर प्रकारात निवृत्ती स्वीकारली होती. धोनी 16 वर्ष हिंदुस्थानी क्रिकेट संघासाठी खेळला होता.

आपली प्रतिक्रिया द्या