लोकशाही वाचवण्यासाठी भाजपविरुद्ध एकत्र येणे ही काळाची गरज – शरद पवार

देशातील संसदीय लोकशाही मर्यादित करण्याचा हा प्रयत्न असून ही लढाई केवळ दिल्लीची नाही तर आपली सर्वांची आहे.

देशातील लोकशाही वाचवण्यासाठी भाजपविरुद्ध सर्वांनी एकत्र येणे ही काळाची गरज असल्याचे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज व्यक्त केले. दिल्लीतील ‘आप’ सरकारविरोधातील विधेयकाला राष्ट्रवादीचे खासदार संसदेत विरोध करतील, असे आश्वासन शरद पवार यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिले.

अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान व ‘आप’च्या अन्य प्रमुख नेत्यांनी आज शरद पवार यांची यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे भेट घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. लोकांनी निवडून दिलेल्या सरकारवर असा निर्लज्ज हल्ला आपण आपल्या 56 वर्षांच्या संसदीय जीवनात कधीच पाहिला नाही, असे शरद पवार यावेळी म्हणाले. देशातील संसदीय लोकशाही मर्यादित करण्याचा हा प्रयत्न असून ही लढाई केवळ दिल्लीची नाही तर आपली सर्वांची आहे, असे पवार म्हणाले.

शरद पवार हे देशातील सर्वात वरीष्ठ नेत्यांपैकी एक असून त्यांनी संसदेत या विधेयकाला विरोध करण्यासाठी  विरोधी पक्ष आणि इतर गैरभाजप पक्षांशी बोलले पाहिजे, असे मत यावेळी अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केले. तर आपला देश मोठी लोकशाही असलेला देश आहे, पण देशात लोकशाहीला मूल्य पायदळी तुडवले जात असल्याची टीका भगवंत मान यांनी केली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांचीही भेट घेणार असल्याचे केजरीवाल यांनी सांगितले.

केजरीवाल आणि पवार यांच्या भेटीमध्ये देशातील सद्यस्थितीबाबत चर्चा झाली. त्याप्रसंगी विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल, श्रीनिवास पाटील, सुनील तटकरे, ‘आप’चे खासदार संजय सिंह, राष्ट्रवादीचे छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, जितेंद्र आव्हाड आदी उपस्थित होते.