देशाचे पंतप्रधान बोलतात त्यात कुठलेही सत्य उरले नाही. चार राज्यांच्या निवडणुका एकत्र घेऊ शकत नाही आणि ‘वन नेशन वन इलेक्शन’च्या बाता काय मारता? म्हटल्याप्रमाणे एकत्र निवडणुका घेऊन दाखवा, असा हल्ला राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केंद्रातील मोदी सरकारवर केला.
स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून भाषण करताना सबंध देशाच्या निवडणुका एकत्र व्हाव्यात, अशी भूमिका मांडली. ती भूमिका मांडून 12 तास होत नाहीत तोवरच जम्मू-कश्मीर आणि हरियाणात निवडणूक जाहीर झाल्याचे पाहायला मिळाले. पंतप्रधान ‘वन नेशन वन इलेक्शन’ची भूमिका मांडत असताना महाराष्ट्र व झारखंडमध्ये निवडणूक जाहीर केली नाही. हे म्हणजे पंतप्रधान मोदी आणि निवडणूक आयोगाच्या धोरणात विसंगती दिसत आहे, असे शरद पवार म्हणाले.
पवार पुढे म्हणाले, शासनाचे धोरण, गृहखात्याची जबाबदारी यावर भाष्य करता येईल; मात्र आज शांतता आणि सौहार्द जास्त महत्त्वाचे वाटते, म्हणून मी अन्य बाबींवर भाष्य करू इच्छित नाही. शांतता कशी प्रस्थापित होईल याबाबत मी अधिक आग्रही आहे. अन्य काही देशात घडणाऱ्या गोष्टींसाठी आपल्या राज्यातील लोकांचे जीवन संकटात येईल असे काही करू नये हे माझे आवाहन आहे.
बांगलादेशात सत्ता परिवर्तन झाले. सत्ता परिवर्तनासाठी तिथे उठाव झाला. त्याची प्रतिक्रिया भारतात काही ठिकाणी उमटत आहे. महाराष्ट्रात काही ठिकाणी घडलेल्या घटना राज्याच्या आणि समाजाच्या हिताच्या नाहीत. आज शांततेची गरज आहे. यासाठी राजकारणात तसेच समाजकारणात वावरणाऱ्यांनी संयमाचा पुरस्कार करावा आणि काही घडणार नाही याबद्दलची खबरदारी घ्यावी, असे शरद पवार म्हणाले.