काँग्रेस-राष्ट्रवादीत जागावाटपाचा तिढा,शरद पवार सोनिया गांधींना भेटले

486
sharad-pawar-sonia-gandhi-v

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीआधीच काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला मेगागळती लागली असली तरी, या दोन्ही काँग्रेसमधील मतभेद काही संपण्याची चिन्हे नाहीत. इंदापूरच्या जागेवरून आघाडीत या अगोदर मिठाचा खडा पडलेला असताना, जागावाटपाचा तिढाही सुटत नसल्याने राज्य पातळीवरील नेत्यांना बाजूला सारत आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सगळी सूत्रे हाती घेत  काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेऊन आघाडीबाबत चर्चा केली.

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्रित निवडणुका लढविण्याचा दृष्टीने जागा वाटपाबाबत आजपर्यंत प्रदेश पातळीवरील नेत्यांममध्ये बैठका झाल्या होत्या. मात्र, जागावाटप सुरळीतपणे होण्याऐवजी आघाडीत बिघाडीच निर्माण झाली आहे. त्यात काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांनी थेट शरद पवारांवरच हल्लाबोल करत बंडाची भाषा केल्यामुळे तसेच हर्षवर्धन यांचा भाजप प्रवेशदेखील जवळपास निश्चित झाल्यामुळे, डॅमेज कंट्रोलच्या दृष्टीने या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते.

इंदापूरच्या जागेचा हट्ट राष्ट्रवादीने सोडावा, असा सोनिया गांधींचा निरोप घेऊन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण काही दिवसांपूर्वीच दिल्लीत शरद पवारांना भेटले होते. मात्र, त्यानंतरही इंदापूरच्या वादग्रस्त जागेबाबत निर्णय होऊ न शकल्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादीसाठी नॉच रिचेबलच ठरलेले हर्षवर्धन भाजपच्या उंबरठय़ावर पोहोचले आहेत. त्यामुळे ज्या जागांवरून दोन्ही काँग्रेसमध्ये वाद आहेत, अशा जागांबद्दलही या भेटीत चर्चा झाल्याचे समजते.

राष्ट्रवादीला मुंबईत हव्यात अधिक जागा 

राष्ट्रवादीला मुंबईतही अधिक जागा हव्या आहेत. त्यामुळेही पेच निर्माण झाला आहे. मुंबईत राष्ट्रवादीची ताकद नगण्य असताना राष्ट्रवादीला जास्त जागा देऊ नयेत, अशी मागणी मुंबईतले काँग्रेस नेते करत आहेत. त्याचबरोबर समविचारी पक्षांना किती आणि कोणाच्या कोटय़ातून जागा सोडायच्या हाही एक कळीचा मुद्दा आहे. या सर्वच मुद्दय़ांच्या अनुषंगाने पवारांनी सोनियांशी विस्तृत चर्चा केल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, मुंबई काँग्रेस अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी मुंबईत राष्ट्रवादीला 6 जागा सोडण्यात आल्या असून काँग्रेस 25 तर मित्र पक्षांना 5 जागा सोडण्यात येणार असल्याचे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

काँग्रेसची पहिली यादी 15 सप्टेंबरला

महाराष्ट्रातील काँग्रेस उमेदवारांची नावे निश्चित करण्यासाठी आज क्रीनिंग कमिटीचे अध्यक्ष ज्योतिरादित्य शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज काँग्रेसची बैठक झाली. या बैठकीला महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आदी नेते उपस्थित होते. काँग्रेसच्या केंद्रीय निवड समितीची बैठक 15 सप्टेंबर रोजी होणार आहे. त्यानंतरच काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी जाहीर होईल, अशी माहिती काँग्रेसमधील सूत्रांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या