माझ्याविषयी अनेकदा आस्तिक की नास्तिक असा वाद रंगवला जातो. मात्र, सर्वधर्म समभावाचा विचार देणारा वारकरी संप्रदाय मी मानतो. पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन घेतो; फक्त दर्शन घेताना त्याचा गाजावाजा करत नाही. माझ्या अंत:करणात पांडुरंगाचा, ज्ञानोबा-तुकोबांचा विचार असतो. त्यामुळे मानसिक समाधान मिळत राहते, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँगेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
राष्ट्रवादी आध्यात्मिक व वारकरी आघाडीच्या वतीने आयोजित वारकरी संमेलनाच्या समारोपावेळी शरद पवार बोलत होते. ते म्हणाले, वारकरी संप्रदायात धर्मांध लोकांचा वावर वाढला आहे. त्यामुळे समाजात कटुता निर्माण होत आहे. ही कटुता संपवून सामाजिक ऐक्य, एकसंध समाज घडवायचा असेल, तर आध्यात्मिक व वारकरी संप्रदायातील लोकांनी समाजातील तळागाळातपर्यंत संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराज यांचे विचार रुजवणे गरजेचे आहे. समाजमन पुरोगामी विचारांवर आधारित असावे. कर्मकांड, रूढी परंपरा याविरोधात भूमिका घेण्याची गरज आहे.