संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह उभारणीसाठी शरद पवारांकडून एक कोटीचा निधी, दोन दिवसांत धनादेश देणार

ऐतिहासिक संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेल्या आगीच्या कारणांचा शोध महिना होत आला तरी अजून सुरूच आहे. तसेच नाट्यगृहाच्या नवीन बांधकामाच्या हालचालीही रखडल्या असतानाच राष्ट्रवादी काँगेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीच नाट्यगृहाच्या उभारणीसाठी आता पुढाकार घेतला आहे. स्वतःच्या खासदार फंडातील एक कोटी रुपयांचा निधी देत असल्याचे त्यांनी जाहीर केले असून, दोन दिवसांत धनादेश पाठवून देण्याच्या सूचना सचिवांना दिल्या आहेत.

खासदार शाहू महाराज छत्रपती आणि आमदार सतेज पाटील यांच्यासह काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींनी आपल्या निधीतूनही रक्कम जाहीर केली आहे. त्यानुसार जिह्यातील उर्वरित लोकप्रतिनिधींनी आपापल्या निधीतील किमान 20 टक्के रक्कम दिली, तर नाट्यगृह उभे राहण्यास मदत होईल. या सगळ्यातून आपण ही वास्तू चांगल्या पद्धतीने उभी करू, असे आवाहनही शरद पवार यांनी केले आहे. सोमवारी दुपारपासून शरद पवार हे तीन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. आज सकाळी त्यांनी महानगरपालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, आमदार सतेज पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांच्यासोबत संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहास भेट देऊन पाहणी केली.

सांस्कृतिक वैभव असलेले ऐतिहासिक संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह गेल्या महिन्यात 8 ऑगस्टला रात्री आगीत भस्मसात झाले. सोबत रोमच्या धर्तीवर साकारलेल्या खासबाग कुस्ती मैदानाच्या बाजूचे ओपन थिएटर असलेल्या व्यासपीठाचीही प्रचंड हानी झाली. दुर्घटनेनंतर कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकारकडून वीस कोटींचा निधी जाहीर केला आहे.