शरद पवार एक दिवसाचे उपोषण करणार, आंदोलन करणाऱ्या खासदारांना दिला पाठिंबा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार यांनी एक दिवसाचे उपोषण करणार असल्याचे जाहीर केले आहे.शरद पवार यांनी धरणे आंदोलन करणाऱ्या खासदारांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यांच्या पाठिंब्यासाठी आपण एक दिवसाचे उपोषण करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. सदनात विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला गेल्याचे त्यांचे म्हणणे आहे.  सदनात मांडण्यात आलेल्या कृषी विधेयकाबाबत विरोधकांच्या मनात काही शंका होत्या. या शंका दूर न करताच हे विधेयक मंजूर करण्यात आले असे शरद पवार यांनी म्हटले आहे. राज्यसभेत जे काही झाले ते पूर्वी कधीच पाहायला मिळाले नव्हते असे पवारांनी म्हटले आहे.

शेतकरी उत्पादन व्यापार व शेतकरी उत्पादन हमीदर या दोन कृषी विधेयकांवर काल राज्यसभेत झालेल्या जबरदस्त गदारोळामुळे सभापती व्यंकय्या नायडू कमालीचे संतप्त झाले होते. सभापतींच्या आसनापुढचा माईक उखडणे आणि उपसभापतींच्या अंगावर चालून जाण्याचा प्रयत्न झाल्यामुळे सभापती कमालीचे व्यथित झाले. या प्रकाराबद्दल दोषी ठरवत सभापती व्यंकय्या नायडू यांनी राज्यसभेच्या तब्बल आठ खासदारांना आठवडाभरासाठी सभागृहातून निलंबित करण्याचा निर्णय सोमवारी घेतला होता. संजय सिंग, डेरेक ओब्रायन, राजीव सातव, डोला सेन, रिपून बोरा, सय्यद नासिर हुसैन, के.के. रोगेश, एल्मारनम करीम यांना आठवडाभरासाठी निलंबित करण्यात येत असल्याचे सभापतींनी जाहीर केले. निलंबित झाल्यानंतर गोंधळी खासदारांनी संसद भवनात ठिय्या मांडून आंदोलन सुरू केले. शिवसेनेचे राज्यसभेतील गटनेते खासदार संजय राऊत यांनी या खासदारांची भेट घेऊन त्यांची भूमिका समजून घेतली.

शेतकऱ्य़ांची पोरे हातात दगड घेतील

‘पाशवी बहुमताच्या जोरावर भलेही तुम्ही लोकसभा आणि राज्यसभेत शेतकरीविरोधी कायदे संमत करून घेतलेत; पण त्याची अंमलबजावणी कशी करणार हे आम्हाला पाहायचे आहे. भलेही तुम्ही कटकारस्थान करून आणि इतर राजकीय पक्षांच्या सहकार्याने शेतकऱ्य़ाला कॉर्पोरेट सेक्टरच्या घशात घातले. हमीभाव हा शेतकऱ्य़ाचा जन्मसिद्ध हक्क आहे. तो जर काढून घेण्याचा प्रयत्न केला तर एक दिवस या देशातील करोडो शेतकऱ्य़ांची पोरं हातात दगड घेतील. या दगडांमध्ये तुमच्या काचा शिल्लक राहणार नाहीत हे लक्षात ठेवा, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे.

उपसभापतींविरोधातला अविश्वास ठराव फेटाळला

उपसभापती हरवंशसिंग यांनी पक्षपातीपणा केल्याचा आरोप करत विरोधी पक्षांनी त्यांच्यावर दाखल केलेला अविश्वास ठराव सोमवारी सकाळी राज्यसभेचे कामकाज सुरू होताच सभापतींनी फेटाळून लावला होता. हा अविश्वास प्रस्ताव निश्चित प्रारूपात नसल्याने तो स्वीकारता येत नसल्याचे सभापतींनी स्पष्ट केले. दरम्यान, सभागृहाचे कामकाज वारंवार बाधित होऊन शेवटी सोमवारी दिवसभरासाठी सभागृह तहकूब करावे लागले होते.

आपली प्रतिक्रिया द्या