गुजरात निकालांवर शरद पवारांची प्रतिक्रिया; गुजरात निकाल म्हणजे…

गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपने मोठं यश मिळवलं आहे. यानंतर विविध राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील गुजरात निकालांच्या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.

‘गुजरातची निवडणूक एकतर्फी होईल यामध्ये कोणाच्या मनात शंका नव्हती. संपूर्ण देशाची सत्ता त्यासाठी वापरण्यात आली. अनेक निर्णय एका राज्याला सोयीचे घेण्यात आले. अनेक प्रकल्प त्या राज्यात कसे येतील याची काळजी घेतली गेली. त्याचा परिणाम गुजरातमध्ये एकतर्फी निकाल लागणार याबद्दल कोणाच्या मनात शंका नव्हती. गुजरात निकाल लागला म्हणजे देशात लोकांचा एका बाजूने मतप्रवाह जातो हे म्हणणे उचित नाही. याचे उत्तम उदाहरण दिल्ली महानगरपालिकेमध्ये तिथल्या जनतेने दाखवले’, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत व्यक्त केली.

‘गेली 15 वर्षे दिल्ली महानगरपालिकेत भाजपाची सत्ता होती ती आता राहिलेली नाही. हिमाचल प्रदेशमध्ये निवडणूक झाली. तिथे भाजपाचे राज्य होते. आताच्या माहितीनुसार या ठिकाणी भाजपाचे राज्य गेले. दिल्लीमधील राज्य गेले. याचा अर्थ हळूहळू बदल व्हायला लागला आहे. राजकारणात पोकळी असते. गुजरातची पोकळी भाजपाने भरून काढली आणि दिल्लीची पोकळी केजरीवाल यांच्या आपने भरून काढली. आज अनेकांना बदल हवे आहेत त्याची नोंद राजकीय जाणकार कार्यकर्त्यांनी घेऊन ती पोकळी भरून काढण्यासाठी आवश्यक ते कार्यक्रम घेतले पाहिजे’, असेही शरद पवार म्हणाले.

सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचं आवाहन

याचसोबत, भाजपच्या प्रवृत्तीविरुद्ध असलेल्या शक्ती आहेत त्या एकत्रित कशा करता येतील व त्या एकत्रित करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना या सर्व कामात प्रोत्साहित करता येईल, राज्याचे सर्व सहकारी कसे महत्वाची कामगिरी करतील हे बघण्याची आवश्यकता असल्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केलं.