फडणवीस सरकारची कर्जमाफी म्हणजे लबाडाघरचे आवतण!

40

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

मोठा गाजावाजा करून फडणवीस सरकारने शेतकऱयांना कर्जमाफी जाहीर केली. पण आठ महिने उलटून गेले तरी शेतकऱयांच्या खाती मात्र छदामही पडला नाही. ही कर्जमाफी म्हणजे लबाडाघरचे आवतण असल्याची जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केली. त्यांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादीच्या हल्लाबोल आंदोलनाचा समारोप झाला.

फडणवीस सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने हल्लाबोल पुकारला होता. दुसऱया टप्प्यात मराठवाडय़ात करण्यात आलेल्या या आंदोलनाचा समारोप विभागीय आयुक्तालयावर मोर्चा काढून करण्यात आला. यावेळी बोलताना शरद पवार यांनी फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठवली. सत्ताधाऱयांबद्दल संपूर्ण देशात नाराजी आहे. सरकारच्या धोरणाने शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. परिस्थिती हाताबाहेर गेल्यामुळे शेतकरी आत्महत्या करत आहे. हमी भाव नाही. कर्जमाफीच्या लबाडीने तर कहरच केला असा टोला पवार यांनी लगावला. बोंडअळीच्या मदतीचीही टोलवाटोलवी चालू आहे. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित दीडपट भाव देण्यात येत असल्याची आवई उठवण्यात आली आहे. परंतु त्यातही काही दम नसल्याचे पवार म्हणाले. हमीभाव देणार असल्याचे सरकार सांगते मात्र उत्पादन खर्च कसा कमी करणार याचे उत्तर सरकारकडे नाही. अर्थसंकल्पात त्यासाठी काहीही तरतूद नाही. खरेदी करण्यात येणाऱया धान्याच्या साठवणीसाठी गोदामे नाहीत. अशा परिस्थितीत हे सरकार शेतकऱयांना कसा न्याय देणार असा सवाल शरद पवार यांनी केला.

कर्जमाफीचा लाभ नाही आणि नवीन कर्ज मिळत नाही. त्यामुळेच शेतकरी अस्वस्थ आहे. त्याचबरोबर बेकारी दूर झालेली नाही, सरकारी नोकरी, कारखानदारी खासगी संस्था, शैक्षणिक संस्थामध्ये नोकरभरतीला बंदी घातली. त्यामुळे तरुणांमध्ये नैराश्य आले आहे. बेरोजगारी, महागाई, धार्मिक दरी जाती-जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम सरकारकडून केले जात असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला. तीन तलाकवरूनही त्यांनी केंद्र सरकारला जाब विचारला. उत्तरप्रदेशातील कासगंज येथील दंगल भाजपनेच घडवल्याचा आरोपही यावेळी पवार यांनी केला.

नोटाबंदीने कुणाचे कल्याण झाले?
केंद्र सरकारने नोटाबंदी केल्यानंतर जिल्हा बँकांनी जुन्या नोटा स्वीकारल्या. परंतु रिझर्व्ह बँकेने जिल्हा बँकांच्या नोटा घेण्यास नकार दिला. यामुळे सर्वात मोठा फटका शेतकऱयांना बसला. तरीही सरकारकडून मदत करण्याऐवजी कायद्याचा बडगा दाखवला जात आहे. शेतकऱयांचे वीज, पाणी कनेक्शन तोडले जात आहे. सरकार असेच करणार असेलतर तरुण, शेतकरी बदल केल्याशिवाय राहणार नाहीत. त्याची सुरुवात मराठवाडय़ातून झाली आहे, असेही शरद पवार म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या