शेअर बाजारातील उलथापालथीत गुंतवणूकदारांची म्युचुअल फंडाला पसंती

762

कोरोना महामारीमुळे शेअरबाजारात मोठी उलथापालथ होत असताना देशातील गुंतवणूकदारांनी सुरक्षित बचत म्हणून म्युचुअल फंडाला पसंती दिल्याचे स्पष्ट झाले आहे. यंदा मे महिन्यात म्युचुअल फंडात 6.12 लाख नव्या गुंतकणूकदारांनी आपली खाती उघडली. याआधी एप्रिल महिन्यात याच फंडात 6.82 लाख नव्या खातेदारांची नोंद झाली होती. गुंतवणूकदारांच्या या ओघामुळे देशात म्युचुअल फंडाच्या खातेदारांची संख्या 9.1 कोटींवर पोचली आहे.

म्युचुअल फंडाचा फोलिओ म्हणजे एका वैयक्तिक खातेदाराचे खाते. एका खातेदाराच्या खात्यात अनेक फोलिओ असू शकतात. असोसिएशन ऑफ म्युचुअल फंडाने दिलेल्या आकडेवारीनुसार देशातील 44 फंड हाऊसेसच्या फोलिओंची संख्या 9 कोटी 10 लाख 41 हजार 392 वर पोचली आहे. जी एप्रिलमध्ये 9 कोटी 4 लाख 28 हजार 589 होती. एप्रिलच्या तुलनेत फोलिओंच्या संख्येत 6.12 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

‘मे’ मध्ये फंडात झाली 63,665 कोटींची गुंतवणूक
रिझर्व्ह बँकेने म्युचअल फंडाची घसरण रोखण्यासाठी या फंडाला 50 हजार कोटी रुपयांची रोख सुविधा देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर देशातील गुंतवणूकदारांचा ओघ म्युचुअल फंडाकडे वळला. या फंडात गुंतवणूकदारांनी मे महिन्यात 63,665 कोटी रुपये गुंतवणुकीचा विक्रम केला. महिनाभरातच या योजनेच्या गुंतवणुकीत 46 टक्के वाढ झाली. त्यामुळेच मेमध्ये या फंडात असणाऱ्या गुंतवणुकीचा आकडा 70,800 कोटी रुपयांवर पोचला. जो एप्रिलमध्ये 46,000 कोटी होता.

आपली प्रतिक्रिया द्या