शेअर मार्केट तेजी असली तरी पैसे गुंतवण्याआधी कुंडली पाहा!

464
share-market

anupriya-desai-astrologer>> अनुप्रिया देसाई (ज्योतिष आणि वास्तु विशारद)

Short term Capital Gain, Long term Capital Gain, Tax, Trading हे शब्द सध्या सर्वसामान्यांच्या तोंडी ऐकू येऊ लागले आहेत. अरे तू हा शेअर घे!! नक्की फायदा होईल आणि खरंच त्या मित्राला फायदा होतो आणि मग मी स्वतः घेतला की त्या शेअर्सची किंमत ढासळते आणि नुकसान होतं. ही वाक्यही नेहमीची झाली आहेत. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या सामान्य आणि मध्यमवर्गीय लोकांची संख्या सध्या वाढत चालली आहे. सगळ्यांना झटपट पैसा कमवायचा आहे. घराचा EMI, मुलांच्या शाळेची फी आणि घरच्या गरजा ह्यांत महिन्याअखेरीपर्यंत पैशांची गणितं जुळवतांना मध्यमवर्गीय माणसाची कसरत होत असते. मग कमी मेहनत आणि वेळ खर्च करून जास्त पैसे कमवण्याचा मार्ग म्हणजे शेअर मार्केट!!

गेल्या पाच सहा वर्षांपासून माझ्याकडे येणाऱ्या जातकांपैकी बऱ्याच जणांनी, “मला शेअर मार्केट मधून काही पैसे कमवता येतील का?” हा प्रश्न विचारलेला आहे. शेअर मार्केट म्हणजेच लॉटरी. पैसे मिळाले तर तुमच्यासारखा भाग्यवान कोणी नाही परंतु पैसे बुडाले तर रावाचा रंक होण्यास वेळ लागणार नाही. काहीजण ह्या शेअर मार्केटच्या इतक्या अधीन होतात की पैसे, दाग-दागिने ह्यांत गुंतवतातच परंतु स्वतःचे राहते घरसुद्धा पणाला लावतात. आणि ग्रह फिरले की हे सर्व एका रात्रीत बुडीत खात्यात जमा होतं. १९९२ साली हर्षद मेहता आणि त्यानंतर केतन पारेख सारख्या व्यक्ति ह्या उत्तम उदाहरण ठरतील. हे माहीत असून सुद्धा लोकांना शेअर मार्केटचा मोह आवरत नाही. आज तुम्हांला शेअर मार्केटमधून कमावणाऱ्या व्यक्तींच्या कुंडलीत काय योग असतात ते सांगणार आहे.

आपल्या कुंडलीत द्वितीय, पंचम, नवम, अष्टम, लाभ स्थान हे महत्त्वाचे ठरतात. ह्या स्थानांचा आणि त्या स्थानांच्या अधिपतींचा एकमेकांशी होणारा योग, ह्या स्थानांमध्ये असणारे ग्रह आणि ह्या ग्रहांचे योग तुम्हाला शेअर मार्केटमार्फत पैसे कमवण्याचे भाग्य लाभणार आहे का ह्याचा निर्देश देतात.

द्वितीय स्थान – धन -संपत्ती स्थान.

पंचम स्थान – झटपट पैसे कमावण्याचे स्थान – शेअर मार्केट, लॉटरी इ.

अष्टम स्थान – अष्टम स्थान हे अचानक पैसे कमवण्याचे स्थान – ह्या स्थानांतून वडिलोपार्जित धनसंपत्ती, साथीदारामार्फत झालेला आर्थिक फायदा, शेअर मार्केटमधून मिळालेला पैसा समजतो.

नवम स्थान – हे स्थान पंचम स्थानाचे पंचम स्थान आणि ह्या स्थानाला भाग्यस्थान म्हणून ओळखले जाते. तुमचा भाग्योदय कधी होणार हे ह्या स्थानांतून समजते.

लाभ स्थान – ह्या स्थानांतून तुम्हांला मिळणारे लाभ कळू शकतात.

व्यय स्थान – नुकसान

ग्रहांपैकी गुरु आणि बुध ह्या ग्रहांना जास्त महत्त्व आहे. गुरु आणि बुधानंतर शनि ह्या ग्रहालासुद्धा महत्त्व आहे. चंद्र आणि राहू ह्या ग्रहांचासुद्धा विचार केला जातो. चंद्र मनाचा कारक. राहू हा अचानक घडणाऱ्या घटना.

पंचम स्थान,द्वितीय आणि लाभ स्थानांचे अधिपती ह्यांचा शुभ योग व्यक्तीला शेअर मार्केट मध्ये लाभदायी ठरतो. हर्षद मेहतांचीच कुंडली अभ्यासली असता त्यांच्या कुंडलीत पाचं स्थानाचा अधिपती आहे शनि आणि शनि स्वतः द्वितीय (धन स्थान ) स्थानात उच्चीचा आहे. म्हणजेच शेअर मार्केटमधून ही व्यक्ती व्यवस्थित कमावणार हे नक्की. बुध आणि गुरु हे ग्रह युतीत असून दशम स्थानात आहेत. परंतु जे कमावलेले ते गमावले कारण धन स्थानाचा अधिपती शुक्र हा व्यय(नुकसान ) स्थानात आहे. शुक्र हा भाग्य स्थानाचा सुद्धा अधिपती आहे.

माझ्या जातकांपैकी एका महिला जातकाच्या कुंडलीत मला तत्सम योग आढळले. त्यांच्या कुंडलीत पंचमेश लाभ स्थानात आणि लाभ स्थानाचा अधिपती उच्चीचा आहे. धन स्थानाचा अधिपती उच्च राशीत असून व्यय (नुकसान) स्थानात आहे. अष्टम स्थानातच गुरु आणि हर्षलची युती आहे. अष्टमेश व्यय स्थानात आहे. ह्यांची शेअर मार्केटमधून होणाऱ्या उत्पनापेक्षा ह्यांनी ज्या शेअर्समध्ये गुंतवले आहे अचानक काही वेळातच त्या शेअर्सचा भाव वधारतो असे पाहण्यात आले आहे. किंवा त्यांनी जेंव्हा अमुक शेअर्स विकले त्यानंतर त्या शेअर्सच्या भावात घट झालेली पहाण्यात आलेली आहे. त्यांचे ह्या संदर्भात Intuition खूप चांगले असल्याचे त्यांच्या ओळखीच्या व्यक्तींचे म्हणणे आहे. Intuition आणि सखोल अभ्यास हा ह्यांचा गुण आहे.

दुसऱ्या एका जातक महिलेच्या कुंडलीत असेच काही साधर्म्य आढळले. त्या ‘Portfolio Manager’ आहेत. त्यांच्या कुंडलीत पंचमेश पंचमातच स्वतःच्याच राशीत असून बुधाच्या युतीत आहे. शनि लाभ स्थानात असून पंचमावर सप्तम दृष्टी आहे. धन स्थानाचा अधिपती पंचम स्थानात. लग्नशही पंचम स्थानांत. गुरु तृतीय स्थानांत असून भाग्य स्थानांवर दृष्टी आहे. त्यांनी ह्या profession मध्ये कमी वेळात चांगला जम बसवला असून लौकिकही कमवला.

अजून एक कुंडली आहे. ह्या जातकाने शेअर मार्केटमधून वेळोवेळी पैसे तर कमावले आहेतच परंतु त्याने स्वतः Financial Analyst चा अभ्यासक्रमही पूर्ण केला आहे. धन स्थानाचा अधिपती तृतीय स्थानात. गुरु स्वतःच्याच धनु राशीत. पंचमेश शनि धन स्थानात उच्चीचा. भाग्य स्थानात राहू. ह्या व्यक्तिला Daily Trading मधून फायदा झाला आहे. ह्या व्यक्तिची वाखाणण्यासारखी गोष्ट म्हणजे कुठल्याही कंपनीचा आणि त्याच्या इतिहासाचा सखोल अभ्यास, जगभरात सुरू असणाऱ्या घडामोडींवर बारीक लक्ष,त्याचा शेअर मार्केटवर होणार परिणाम, परदेशातील शेअर मार्केटचा अभ्यास आणि मग गुंतवणूक.

एकंदरीत सर्व कुंडल्यांचा, योगांचा आणि ग्रहांचा अभ्यास करता-

१) शनिची कुंडलीतील स्थिती चांगली असावी.

२) गुरु ग्रहाचा support असावा.

३) धनेश सुस्थित असावा.

४) लाभेश आणि भाग्येश व्यय स्थानी असू नयेत.

५) पंचम स्थानावर शुभ ग्रहांची दृष्टी असावी.

६) राहू शुभ स्थानी असावा.

७) महादशांचा support असावा.

शेअर मार्केटचा अभ्यास कितीही केला तरी तो एक सट्टाच आहे. सिगारेटच्या पाकिटावर ‘हानिकारक’ हे इशारा दिलेली असून सुद्धा त्याचा वापर कमी झालेला नाही. शेअर मार्केट मध्ये रावाचे रंक झालेल्या लोकांचे संख्या कमी नाही परंतु प्रत्येकजण ह्या सट्टा बाजारात आपले नशीब आजमावून बघण्यास उत्सुक आहे हे खरे !!

कसा वाटला हा लेख? प्रतिक्रिया जरूर कळवा – [email protected]

संपर्कसाठी मोबाईल क्रमांक- ९८१९०२१११९ (फक्त संध्याकाळी ६ ते ८ यावेळातच फोन करणे)

summary: kundali helps you to invest in share market

आपली प्रतिक्रिया द्या