पडद्याची परंपरा आणि कंपन्यांची जाहिरातबाजी

>>मुजफ्फर हुसेन<<

m_hussain१९४५@yahoo.com

इस्लामी शरियतनुसार प्रत्येक मुस्लिम राष्ट्रांत पडद्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पडदा, बुरखा, हिजाब, रिदा अशा विविध नावांनी ओळखला जात असला तरी पडदा हा पडदाच असतो आणि रक्ताचे नाते नसलेल्या पुरुषांपासून स्वतःला झाकून ठेवण्यासाठी महिला तो वापरतात. अर्थात पडद्याचा व्यवसाय हा कोटय़वधी डॉलर्सच्या घरात जात असल्याचे पाहून कंपन्यांनी पडद्यातही आता फॅशन सुरू केली आहे. त्यामुळे मुस्लिम मुल्लामौलवींपासून महिलांपर्यंत अनेकजण नाराज आहेत.

जेव्हापासून मुस्लिम महिलांच्या पडद्याला फॅशनचा दर्जा दिला जात आहे तेव्हापासून मौलाना व मुस्लिम महिला चिंतित झाल्या आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, पडदा मुस्लिम महिलेसाठी आदराचे, सन्मानाचे प्रतीक आहे. शरियतमध्ये पडद्याला उच्च स्थान आहे. शरियतनुसार पडदा अनिवार्य आहे. महिलांसाठी धर्माने अनिवार्य आहे. पडद्याबाबतची शिस्त कुणी मोडत असेल, वेगळय़ा पद्धतीने वापर करीत असेल तर ते धर्मविरोधी तर आहेच, शिवाय त्यातून धर्माविषयीचा अनादरही व्यक्त होतो. असा अनिवार्य असलेला पडदा कुणी देखाव्यासाठी वापरत असेल तर तो इस्लामशी द्रोहच मानावा लागेल. कट्टरपंथीयांच्या म्हणण्यानुसार स्त्रीचा चेहरा झाकण्यासाठी किंवा तिचे शरीर झाकण्यासाठी असलेला पडदा जर एखादी स्त्री फॅशन म्हणून वापरीत असेल तर ते शरियतला बिलकूल मान्य असणार नाही.

सध्या फॅशन ब्रॅण्डेड आणि बहुराष्ट्रीय कंपन्या अशा महिलांच्या जाहिराती करीत आहेत ज्या इस्लामी पद्धतीने आपल्या चेहऱ्यावर स्कार्फ घालतात. या जाहिरातींमुळे मुस्लिम महिला नाराज झाल्या आहेत. जाहिरातीत दाखवल्या गेलेल्या महिला मुस्लिम वेशभूषा करणाऱ्या दाखवल्या जातात. पडदा परिधान करताना तर त्या निव्वळ मुस्लिम म्हणूनच दाखवल्या जातात. पडद्याबाबत नेहमीच मानवाधिकाराची कड घेणारे आणि सेक्युलरवादी चर्चा करतात, परंतु सध्या मुस्लिम महिलाही या वादात उतरल्या आहेत. त्यांचा प्रश्न असा आहे की, अशा प्रकारच्या जाहिराती का प्रदर्शित केल्या जात आहेत? एक जाहिरात अशी आहे की, पडदा परिधान केलेली महिला आपल्या कॅमेऱ्याने एक फोटो काढते. अब्जावधी डॉलर्स कमावणाऱ्या कंपन्या यातून असे दाखवण्याचा प्रयत्न करतात की, महिला कितीही शिकल्या तरी त्यांना पडदा घालणे आवश्यकच आहे आणि अशी पडदा घालणारी महिलासुद्धा काही उत्पादनांच्या आकर्षणापासून स्वतःला रोखू शकत नाही. पडदा परिधान करूनही त्या संबंधित उत्पादनाचे छायाचित्र घेतात.

पडद्याविषयी केवळ एका पेप्सीनेच जाहिरात केली असे नव्हे. केवळ पडदा वापरणाऱ्या महिलांची केवळ जाहिरातच केली जाते असेही नव्हे तर पडद्यावरही विविध प्रकारची चित्रं रेखाटून फॅशन आणली जात आहे. काही दिवसांपूर्वी नाइकी नामक एका कंपनीने अशा प्रकारचा पडदा तयार करणे सुरू केले ज्यावर खेळाडू महिलांचे चित्र चितारलेले आहे. हे पडदे २०१८ मध्ये बाजारपेठेत येणार आहेत. एच ऍण्ड एम कंपनीने या परद्याच्या प्रचारासाठी पहिल्या मुस्लिम मॉडेलचा वापर केला आहे. इतर अनेक उत्पादने रमजान कलेक्शन या नावाने जाहिराती देतात जेणेकरून मुस्लिम ग्राहक आकर्षित व्हावा. जाहिरातीत मुस्लिम महिला दाखवून कंपन्या असे दाखवण्याचा प्रयत्न करीत असतात की, मुस्लिम महिलाही प्रगतिशील आहेत. अशा महिलांसाठी फॅशनेबल पडद्यांचा आणि मेकअपसाठी आवश्यक असलेल्या गोष्टींचा मोठय़ा प्रमाणात पुरवठा केला जातो. ही सेवा पुरवणारे लाखो लोक पडद्याआडच असतात. अनेक महिला आता असे स्पष्ट करू लागल्या आहेत की, त्यांच्यावर फॅशनेबल दिसण्याबाबत दबाव वाढत चालला आहे. या महिलांना असे वाटते की, पडदा हा सोडण्याजोगा भाग झाला असून पडदा ही पवित्र वस्तू जाहिरातीच्या हल्ल्यात सापडली आहे.

एका ऑनलाइन नियतकालिकेच्या संपादिका खदीजा अहमद यांनी आपली आत्मकथा प्रकाशित केली आहे. त्यात त्यांनी लिहिले आहे की, दोन वर्षे त्यांना कसा पडदा वापरावा लागला. नंतर त्यांनी पडदा न वापरण्याचा निर्णय घेतला. सोशल मीडिया आणि वृत्तपत्रांमध्ये महिलांना बुरखा किंवा हिजाब घातलेले पाहून आपण अधिक चांगले दिसायला हवे असे त्यांना वाटू लागे. काही महिलांना असेही वाटते आहे की, विविध कंपन्यांच्या ब्रॅण्डमुळे त्यांना पाठबळ मिळत असले तरी त्यांना या कंपन्यांची गरज नाही. कारण या कंपन्या काही महिलांना मदत करीत नाहीत.

वास्तवात एकीकडे जगभर बुरखा घालणाऱ्या महिलांची संख्या कमी होत आहे. महिलांच्या अधिकारासाठी लढणाऱ्या काही महिला कार्यकर्त्यांचा बुरख्याबाबत दृष्टिकोन काहीसा वेगळा आहे. ज्या देशात बुरखा वापरणे सक्तीचे आहे अशा इराणमध्ये एक पत्रकार माशूकअली निजाद यांनी फेसबुकवर ‘माझे गुप्त स्वातंत्र्य’ या नावाने एक मोहीम सुरू केली आहे. ज्यात काही इराणी महिला आपला पडदा काढताना दाखवले आहे. पाश्चात्य मीडिया परद्याच्या समस्येला साधारण समस्या मानतात. ते मुस्लिमांबाबत वाद निर्माण करू पाहतात. परंतु त्यांनाही हे माहिती नसावे की, मुस्लिम देशांत लाखो महिलांना बळजबरीने पडदा घालायला भाग पाडले जाते.

त्याचवेळी दुसरीकडे एखादी कंपनी जेव्हा धार्मिकता दर्शवणाऱ्या कपडय़ांमध्ये रस घेते तेव्हा त्यामागे निश्चितच व्यावसायिक कारण असते. सध्याच्या काळात मुस्लिम ग्राहकांची संख्या वाढत चालली आहे. त्यातून कंपन्यांना मोठी कमाई करायची आहे. पडद्याचा व्यवसाय आता किती तरी दशलक्ष डॉलर्सचा होतोय. पडदा वापरता की नाही, पडदा वापरायला हवा की नाही या वादाशी बहुराष्ट्रीय कंपन्यांना देणेघेणे नाही. त्यांना व्यवसाय हवा. त्यामुळे पडद्याला ते फॅशन बनवू पाहत आहेत, परंतु त्यांच्या या कृतीमुळे मुस्लिम महिला नाराजही होत आहेत. हिजाब किंवा पडदा हा मुस्लिम धर्मातील एक धार्मिक व पारंपरिक वेशभूषा आहे. पुरुषी नजरेपासून मुस्लिम स्त्रीचे संरक्षण हा हेतू हिजाब आणि पडद्यामागे आहे. अर्थात पडदा कुणाशी करावा आणि कुणाशी करू नये ही एक अतिशय किचकट बाब आहे. माहेरी राहणाऱ्या नातेवाईकांपासून पडदा केला जात नाही. परंतु सासरी राहणाऱ्या आणि रक्ताचे नाते नसलेल्या परिवारात असताना पडदा करावा लागतो.

आपल्या देशात बुरखे किंवा त्याच्याशी साधर्म्य असलेले पडदे हे साध्या कपडय़ाचे असतात. त्याची एक ठरावीक किंमत असते, पण आता कंपन्या ज्या हिजाब बाजारात आणत आहेत त्या मध्यपूर्व किंवा पाश्चात्य राष्ट्रात मिळणाऱ्या पडद्याची सजावट अतिशय कलाकुसरीची आणि बहुमूल्य असते. जरी इस्लामेतर राष्ट्रांमध्ये पडद्याविषयी महत्त्व नसले, मूल्य नसले, आकर्षण नसले तरी इस्लामी राष्ट्रांमध्ये परद्याला फार महत्त्व आणि मूल्यसुद्धा आहे. पडद्यालाच अरबी आणि फारसी भाषेत हिजाब म्हटले जाते. हिंदुस्थानी उपखंडात त्यास बुर्का असेच म्हटले जाते. हिंदुस्थानातील अनेक भागांत यास रिदा असेही म्हटले जाते. पडद्याच्या बाबतीत सौदी आणि इराणमधील लोक अधिक कट्टर आहेत. संपूर्ण इस्लामी जगात हिजाब बनवण्याच्या विविध पद्धती आहेत. काहीही म्हटले तरी पडदा हा पडदाच असतो एवढे मात्र नक्की!