काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष नेमावाच लागेल, सोनिया गांधींवर अधिक भार टाकणे योग्य नाही!

494

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष म्हणून सोनिया गांधी यांचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होत असतानाच सोनिया गांधींवर अधिक भार टाकणे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी व्यक्त केली आहे. काँग्रेसची दिशाहीन पक्ष अशी ओळख जनमानसात होत असून ती बदलायची असेल तर काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष नेमावाच लागेल. पक्षाला नेतृत्क देण्याची क्षमता राहुल गांधी यांच्यात आहे. मात्र जर त्यांना अध्यक्ष व्हायचे नसेल तर नवीन अध्यक्ष शोधण्याची कवायत काँग्रेसला करावीच लागेल, असे थरूर यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे.

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा म्हणून सोनिया गांधी यांना 10 ऑगस्ट रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर शशी थरूर यांचे वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे. काँग्रेसला नेतृत्वाबाबत स्पष्ट भूमिका घ्यावीच लागेल. सोनिया गांधी या मागील वर्षी हंगामी अध्यक्षा झाल्या त्यावेळी त्यांचे मी अभिनंदनच केले होते. मात्र अनिश्चित काळासाठी त्या हंगामी अध्यक्षा राहतील अशी अपेक्षा बाळगणे योग्य नाही. त्यामुळे लवकरात लवकर कायमस्वरूपी अध्यक्ष निवडायला हवा.

राहुल यांनी राजीनामा मागे घ्यावा

राहुल गांधी हे जर पुन्हा पक्षाची कमान हाती घेण्यास तयार असतील तर त्यांनी राजीनामा मागे घ्यायला हवा. 2022 पर्यंत त्यांची अध्यक्षपदासाठी निवड झाली आहे. पण ते यासाठी इच्छुक नसतील तर मात्र लवकरात लवकर कार्यवाही करावी लागेल. काँग्रेसची कार्यकारिणी आणि अध्यक्षपदाची निवडणूक घेतल्यास त्याचा पक्षाला फायदाच होईल, असे ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या