भाजप म्हणजे ‘वन मॅन शो’ आणि दोन सैनिकांची सेना, शॉटगनचा टोला

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

ज्येष्ठ अभिनेते आणि राजकीय नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाना साधला आहे. गुजरात आणि हिमाचल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना सिन्हा यांनी ही निवडणूक भाजपसाठी जड जाणार असल्याचे म्हटले आहे. तसेच अशा परिस्थितीतून सुटका करण्यासाठी ‘वन मॅन शो’ आणि दोन सैनिकांची सेना या मानसिकतेतून बाहेर यावे लागेल असे म्हणत त्यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांवर अप्रत्यक्षपणे निशाना साधला आहे. भाजपाने घेतलेल्या निर्णयामुळे तरुण, शेतकरी आणि व्यापारी वर्ग हे पूर्णपणे असमाधानी असल्याचेही सिन्हा म्हणाले. पीटीआयने यासंदर्भात माहिती दिली आहे.

पीटीआयशी बोलताना सिन्हा म्हणाले की, तरुण, शेतकरी आणि व्यापारी वर्ग असमाधानी असल्याचा तोटा भाजपला गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये होणाऱ्या निवडणुकीत होऊ शकतो. याठिकाणी त्यांना जोरदार टक्कर मिळू शकते, असेही सिन्हा म्हणाले. पक्षातील वरिष्ठ नेत्यांना त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल सन्मान मिळावा आणि त्यांच्या मार्गदर्शनासह पुढे चालावे, असेही सिन्हा म्हणाले. लाल कृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, यशवंत सिन्हा आणि अरुण शौरी यांची काय चुक झाली हे मला अजूनही उमगले नसल्याचे सिन्हा म्हणाले.

सिन्हा यांनी नोटाबंदीच्या निर्णयावरही टीका केली आहे. नोटाबंदीमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्याचे पक्षाने मान्य करावे, असे सिन्हा म्हणाले. शत्रुघ्न सिन्हा यांनी याआधीही भाजपवर शरसंधान साधत वक्तव्ये केली आहेत.