रियाच्या भावाची रात्रभर चौकशी

1961

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिची चौकशी केल्यानंतर तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती याची काल रात्रभर चौकशी केली. तब्बल 18 तास चाललेल्या या चौकशीत शोविक चक्रवर्ती याच्याकडे ईडीने मनी लॉण्डरिंग आणि सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रश्नी अनेक प्रश्न विचारल्याचे कळते.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या आत्महत्या प्रकरणी त्याच्या वडिलांनी सुशांतच्या खात्यातून कोटय़ावधी रुपये काढण्यात आल्याचा आरोप केला आहे. या आरोपानंतर याप्रकरणी ईडीने तपास सुरु केला असून ईडीने शनिवारी अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिची चौकशी केली होती. त्यानंतर शनिवारी रात्री ईडीने मुंबईतील बेलार्ड ईस्टेट येथील कार्यालयात रियाचा भाऊ शोविक चक्रवर्तीची कसून चौकशी केली. रात्रभर झालेल्या चौकशीनंतर शोविकला सकाळी 6.30 वाजता ईडीच्या कार्यालयातून सोडण्यात आले. याप्रकरणी ईडीने मनी लॉण्डरिंग प्रकरणी शोविकचा अधिकृत जबाव नोंदवून घेतला असल्याची माहिती पुढे आली आहे.

तत्पूर्वी ईडीने 7 ऑगस्ट रोजी देखील शोविकची चौकशी केली होती. त्यानंतर ईडीने त्याची बहिण आणि या प्रकरणातील प्रमुख आरोपी रिया चक्रवर्ती हिची शनिवारी आठ तासांहून अधिकवेळ चौकशी केली होती.

आजही होऊ शकते चौकशी
दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ईडीकडून सोमवारी पुन्हा एकदा रियाला चौकशीसाठी बोलाविले आहे. यावेळी तिचे वडील इंद्रजीत मुखर्जी यांची देखील चौकशी होणार असल्याचे कळते. तत्पूर्वी शुक्रवारी ईडीने इंद्रजित आणि रियाचे चार्टड अकाउंटन्ट रितेश शहा आणि मॅनेजर श्रुती मोदी हिची चौकशी केली होती.

काम नसताना इतकी संपत्ती कशी?
गेल्या अनेक महिन्यांपासून रियाकडे कोणतेही काम नाही. त्यातच तिच्या चित्रपट फ्लॉप झालेले असताना तिच्याकडे इतकी संपत्ती कशी आली, याचा तपास ईडीकडून केला जात आहे. त्याचबरोबर तिने काही दिवसांपासून घरांचे व्यवहार देखील केले आहेत. त्यासंदर्भात देखील ईडीकडून चौकशी सुरू असल्याचे कळते.

आपली प्रतिक्रिया द्या