
पुणे जमीन घोटाळा प्रकरणातील गायब झालेली आरोपी शीतल तेजवानी अखेर प्रकट झाली आहे. गुन्हा रद्द करण्यासाठी तेजवानीने हायकोर्टात धाव घेतली असून चुकीच्या पद्धतीने यात नाव गोवण्यात आल्याचा आरोप तिने केला आहे. हायकोर्टाने मात्र तेजवानीला दिलासा देण्यास नकार देत याचिकेवर आज तत्काळ सुनावणी घेण्याची तिची मागणी फेटाळून लावली. त्यामुळे तेजवानीच्या अडचणी वाढल्या असून तिला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.
सरकारी जमीन हडपल्या प्रकरणी शीतल तेजवानी, पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील तसेच अन्य संबंधितांवर खडक आणि बावधन पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर शीतल तेजवानी गायब होती. आता गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी तिने हायकोर्ट गाठले आहे. अॅड. दीपाली केदार यांच्यामार्फत तिने याचिका दाखल केली असून या याचिकेवर आज मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अनखड यांच्या खंडपीठासमोर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती याचिकाकर्त्यांनी केली, मात्र न्यायालयाने ती धुडकावली.
g एफआयआरमधील मुख्य विषय असलेल्या सर्वे क्र. 62, मौजे बोपोडी या मालमत्तेशी कोणताही संबंध नाही, कोणत्याही तथ्यात्मक किंवा कायदेशीर आधाराशिवाय चुकीच्या पद्धतीने एफआयआरमध्ये नाव गोवण्यात आले आहे, इतकेच नव्हे तर मुंढवा येथील व्यवहारांची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या उच्चस्तरीय समितीचा अहवाल समोर येणे बाकी असतानाही मनमानीपणे गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे पोलिसांनी नोंदवलेला एफआयआर अपरिपक्व आणि असमर्थनीय असल्याचा दावा करत शीतल तेजवानीने हा गुन्हा रद्द करण्याची मागणी याचिकेत केली आहे.





























































