न्यायालयाने निर्दोष ठरवूनही सावरकरांची व्यक्तीव्देषापोटी बदनामी, शेषराव मोरे यांचे संतप्त विधान

1432

गांधी हत्या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर निर्दोष असल्याचा निःसंदिग्ध निर्वाळा दिला असूनही काही जण केवळ व्यक्तीव्देषापोटी सावरकरांची बदनामी करीत आहेत, असे विधान विचारवंत शेषराव मोरे यांनी केले. एवढेच नव्हे तर सावरकरांची देशभक्ती आणि त्यांनी केलेले कार्य विसरून केवळ व्यक्तीव्देषापोटी त्यांना गांधी हत्या खटल्यात गुंतवून त्यांची बदनामी करण्याचे कृत्य हा फौजदारी गुन्हा आहे, असेही शेषराव मोरे यांनी सांगितले.

संस्कार भारती विदर्भ शाखेच्या वतीने शेषराव मोरे यांच्या गांधी हत्या आणि सावरकरांची बदनामी या पुस्तकाबद्दल त्यांना कै. डॉ. कल्पना व्यवहारे उत्कृष्ट वाड़्मय पुरस्कार संस्कार भारतीचे अजय देशपांडे, भगवानराव देशमुख, आशुतोष अडोणे, दत्तात्रय देशपांडे,  विवेक कौठेकर यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. तसेच याच विषयावर त्यांचे व्याख्यानही आयोजित करण्यात आले होते. सत्कारास उत्तर देताना आणि गांधी हत्या व सावरकरांची बदनामी या विषयावर व्याख्यान देताना ते बोलत होते.

शेषराव मोरे पुढे म्हणाले की, गांधी हत्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात स्पष्टपणे म्हटले आहे की, गांधी हत्येचा आरोप सावरकरांवर सिद्ध होऊ शकत नाही. त्यांच्याविरुद्ध कोणताही पुरावा नाही. न्यायालयाचा निकाल एवढा स्पष्ट असताना देखील काही जण अजूनही कपूर कमिशनचा हवाला देऊन या प्रकरणी सावरकरांची बदनामी करीत आहेत. हा फौजदारी दर्जाचा गुन्हा आहे. याविरुद्ध सर्वांनी आवाज उठविला पाहिजे, असेही ते म्हणाले.

गांधी हत्या प्रकरणात सावरकरांना  आरोपी करण्यात आले हे खरे आहे, परंतु केवळ नथुराम गोडसे त्यांचा अनुयायी आहे या कारणामुळे हा आरोप ठेवण्यात आला होता. गांधी हत्येचा सावरकरांशी संबंध लागेल असा कोणताही पुरावा न्यायालयासमोर सादर झाला नाही. सरकारी पक्षाने या  प्रकरणात माफीचा साक्षीदार असलेल्या मोरेश्वर बडगे याची साक्ष हा एकमेव पुरावा सावरकरांविरुद्ध सादर केला होता.

गांधी हत्येनंतर काही वर्षांनी म्हणजे 1975 मध्ये मनोहर माळगावकर या साहित्यिकाने द मेन हू किल्ड गांधी या नावाचे पुस्तक लिहिले. त्या पुस्तकाच्या लेखनासाठी माळगावकर यांनी मोरेश्वर बडगे यांची मुलाखत घेतली. त्यावेळी बडगेंनी स्पष्ट सांगितले की, पोलिसांच्या छळामुळे मी सावरकरांविरुद्ध खोटी साक्ष दिली. असे असूनही सावरकरांची बदनामी काही जण करीत आहेत. हे संतापजनक आहे. य. दि. फडके हेही असेच गांधीव्देष्ट्ये लेखक आहेत. त्यांनी नथुरामायण नावाचे पुस्तक लिहिले आहे. त्यामध्ये त्यांनी खोटे पुरावे सादर करून सावरकरांची बदनामी केली आहे.

 हा सावरकरप्रेमी जनतेचा सत्कार

संस्कार भारतीच्या वतीने माझ्या गांधी हत्या आणि सावरकरांची बदनामी या पुस्तकास देण्यात आलेला पुरस्कार हा केवळ माझा सत्कार नसून सावरकरप्रेमी जनतेचा सत्कार आहे, अशा शब्दांत ख्यातकीर्त विचारवंत शेषराव मोरे यांनी सत्कारास उत्तर दिले. प्रास्ताविकामध्ये आशुतोष अडोणे यांनी पुरस्कारामागची भूमिका स्पष्ट केली.

आपली प्रतिक्रिया द्या