शेवगावात शेतकऱयांचा ‘रास्ता रोको’, सरकारविरोधात संताप

शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव मंडलातील 17 ते 18 गावांत झालेल्या अतिवृष्टी व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱयांच्या पिकांचे तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई मिळावी तसेच वादळाने पडलेले खांब, तुटलेल्या तारा दुरुस्त करून वीजपुरवठा सुरळीत करावा, या मागणीसाठी शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव फाटा येथे शेतकऱयांनी ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. दोन तास चाललेल्या या आंदोलनामुळे शेवगाव-नेवासा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी शेतकऱयांनी राज्य सरकारविरोधात संताप व्यक्त केला.

पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. क्षितीज घुले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. डॉ. घुले म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी नगर जिल्हा दौऱयात शेवगाव तालुक्यात मोठय़ा प्रमाणात नुकसान होऊनही याबाबत चकार शब्दही काढला नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्री, कृषिमंत्री व मतदारसंघाच्या लोकप्रतिनिधींना शेतकऱयांचे काहीही देणेघेणे नसल्याचे स्पष्ट झाले. केवळ सवंग लोकप्रियतेसाठी सर्व चालले असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या अडचणी आपल्यालाच सोडवाव्या लागतील. आपण सर्वजण एकत्रित झालो आहोत. आपले हक्क मिळण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

राष्ट्रवादी युवक संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे, अनिल मडके, पंडितराव भोसले, बबन भुसारी, नंदकुमार मुंढे, माउली निमसे, अशोक मेरड, राजेंद्र आढाव, राजेंद्र देशमुख, डॉ. सुधाकर लांडे, राजेंद्र फटांगडे, कांता निकम, अंबादास कळमकर, विठ्ठल फटांगरे, शंभू गवळी, सखाराम लव्हाळे, प्रवीण मरकड, भाऊराव माळवदे , लतीफ पटेल, भरत वांढेकर, संतोष मेरड, प्रदीप काळे, शहादेव खोसे, दादा-पाटील उगले, विकास नन्नवरे, माउली जगताप, संतोष पावसे, अभिजित आहेर, दीपक चोपडे, भागवत बडे, संकेत वांढेकर यांच्यासह परिसरातील शेतकरी मोर्चामध्ये सहभागी झाले होते.

परीक्षाविधीन तहसीलदार राहुल गुरव, नायब तहसीलदार रवींद्र सानप, तालुका कृषी अधिकारी अंकुश टकले यांनी निवेदन स्वीकारले. येत्या दोन-तीन दिवसांत तालुक्याचा नुकसानीचा अहवाल वरिष्ठ स्तरावर सादर करण्यात येईल, असे आश्वासनानंतर आंदोलन स्थगित केले. सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र बागुल, बाबासाहेब गरड, बप्पासाहेब धाकतोडे यांच्या पथकाने चोख बंदोबस्त ठेवला.