अयोध्येत राम जन्मभूमीवर राम मंदिरच हवे, वक्फ बोर्डाचे प्रतिज्ञापत्र

24

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

अयोध्येतील राम जन्मभूमीवर रामाचे मंदिरच बांधण्यात यावे अशा स्वरुपाचे प्रतिज्ञापत्र शिया वक्फ बोर्डाने सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी दाखल केले. याच प्रतिज्ञापत्रात राम मंदिरापासून थोड्या अंतरावर मुस्लिमबहूल भागामध्ये मशिदीची उभारणी केली जाऊ शकते, असेही शिया वक्फ बोर्डाने नमूद केले आहे.

शिया वक्फ बोर्डाने अयोध्या खटल्यातील सर्व पक्षकारांशी चर्चा करण्याचा अधिकार आपल्याकडे असल्याचे स्पष्ट केले. संवादाच्या माध्यमातून आणि शांततापूर्ण पद्धतीने समाधानकारक तोडगा काढण्याचा अधिकार वक्फ बोर्डाकडे आहे, असा उल्लेख न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये करण्यात आला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांच्या विशेष खंडपीठापुढे ११ ऑगस्टपासून अयोध्या प्रकरणी सुनावणी होणार आहे. त्यापूर्वी शिया वक्फ बोर्डाने दाखल केलेले प्रतिज्ञापत्र महत्त्वाचे मानले जात आहे. न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांच्या अधिपत्याखालील तीन सदस्यांच्या खंडपीठाची स्थापना करण्यात आली आहे. त्या खंडपीठात न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती अब्दुल नझीर यांचा समावेश आहे. राम मंदिर प्रकरणी जमिनीच्या वादात हे तीन सदस्यांचे खंडपीठ निकाल देणार आहे. जमीनीचा मालकी हक्क कोणाचा हे निकालातून स्पष्ट होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या