हिंदुस्थानचा मालिका विजय

सामना ऑनलाईन । विशाखापट्टणम

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानच्या क्रिकेट संघाने रविवारी सलग आठव्या वन डे मालिका विजयावर शिक्कामोर्तब केले. टीम इंडियाने येथे झालेल्या अखेरच्या वन डेत श्रीलंकेचा आठ गडी व १०७ चेंडू राखून धुव्वा उडवला आणि तीन सामन्यांची मालिका २-१ अशा फरकाने खिशात टाकली. तीन बळी गारद करणारा डावखुरा फिरकी गेलंदाज कुलदीप यादवची सामनावीर तर या लढतीत नाबाद १०० धावांची खेळी साकारणाऱया शिखर धवनची मालिकावीर म्हणून निवड करण्यात आली.

२१६ धावांचा पाठलाग करणाऱया टीम इंडियाने दोन गडी गमावून विजयी लक्ष्य ओलांडले. अकिला धनंजयाने मागील लढतीतील द्विशतकवीर रोहित शर्माला सात धावांवर बाद केले, पण त्यानंतर शिखर धवन व श्रेयस अय्यर या जोडीने दुसऱया विकेटसाठी १३५ धावांची सणसणीत भागीदारी करून लंकन गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. मागील डावात ८८ धावांची खेळी साकारणाऱया मुंबईकर श्रेयस अय्यरने या लढतीतही 65 धावांची खेळी केली.

दरम्यान, त्या आधी उपुल थरंगा व सादिरा समरविक्रमा या जोडीने दुसऱया विकेटसाठी १२१ धावांची भागीदारी  करीत लंकेला आशा दाखवली. पण युजवेंद्र चाहलने सादिरा समरविक्रमाला ४२ धावांवर आणि कुलदीप यादवने उपुल थरंगाला ९५ धावांवर बाद करून लढतीला कलाटणी दिली.  त्यांचा डाव २१५ धावांमध्येच आटोपला. कुलदीप यादव व युजवेंद्र चाहल या फिरकीवीरांनी प्रत्येकी तीन गडी बाद करून हिंदुस्थानच्या बाजूने सामना फिरवला.