रोहित शर्माचा शिखर धवनबाबत गौप्यस्फोट, ‘गब्बर’ने आरोप फेटाळत केला पलटवार

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागू करण्यात आले असून याला क्रीडा क्षेत्रही अपवाद नाही. यामुळे मैदानात फटकेबाजी करण्याची सवय असणारे खेळाडू सध्या सोशल मीडियावर ‘षटकार’ ठोकताना दिसत आहे. टीम इंडियाचा ‘हिटमॅन’ रोहित शर्माही सोशल मीडियावर सक्रिय असून त्याने शिखर धवनबाबत एक गौप्यस्फोट केला आहे. विशेष म्हणजे रोहितच्या या विधानाला ‘गब्बर’नेही तात्काळ प्रत्युत्तर दिले आहे.

रोहित शर्मा याने ऑस्ट्रेलियाचा दिग्गज सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (David Warner) याच्यासोबत लाईव्ह गप्पादरम्यान एक खुलासा केला. शिखर धवन (Shikhar Dhawan) नेहमीच पहिला चेंडू खेळण्याची रिस्क घेत नाही, असे रोहित म्हणाला. इरफान पठाणसोबत लाईव्ह गप्पा मारताना शिखर याने रोहितला उत्तर दिले आहे.

2013 मध्ये मी टीम इंडियात पुनरागमन केले. त्या लढतीत मी आणि रोहित शर्मा सलामीला उतरलो होतो. त्यावेळेस रोहित शर्माने स्ट्राईक घेतली आणि पहिला चेंडू खेळला. तेव्हापासून नेहमी असेच सुरू आहे, असे शिखर धवन म्हणाला. तसेच शेवटच्या चेंडूवर सिंगल घेण्याचा आरोपही शिखरने फेटाळला.

काय म्हणाला होता रोहित?
शिखरसोबत हैद्राबाद सनरायझर्स संघाकडून खेळणारा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरशी बोलताना रोहित हे विधान केले होते. वॉर्नरच्या एका प्रश्नाला उत्तर देताना रोहित म्हणाला, तो (शिखर धवन) पहिला चेंडू खेळण्यास उत्सुक नसतो. त्याला फिरकीपटूचा सामना करण्यास आवडते. 2013 ला मी मर्यादित षटकांच्या लढतीत सलामीला उतरलो तेव्हा माझ्यासोबत शिखर होता. मला अजूनही आठवते की चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सलामीवीर म्हणून माझा तो दुसरा सामना होता.

अवघड सामना
त्या लढतीबाबत बोलताना रोहित म्हणाला, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तो सामना होता आणि समोर मोर्ने मोर्केल आणि डेल स्टेन ही वेगवान दुकडी होती. मी त्यांचा सामना केला नव्हता, म्हणून मी शिखला स्ट्राईक घेण्यास सांगितले. मात्र त्याने नकार दिला. मला आठवते मोर्ने मोर्कलचा चेंडू मला दिसलाही नव्हता, असेही रोहित म्हणाला.

आपली प्रतिक्रिया द्या