वर्ल्डकपमधून बाहेर गेल्यामुळे शिखर भावूक, सोशल मीडियावर पोस्ट केली शेअर

25

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धा मध्यावर आली असताना टीम इंडियाला मोठा धक्का बसला. बोटाला झालेल्या दुखापतीमुळे शिखर धवन स्पर्धेतून बाहेर फेकला गेला. दुखापतीमुळे आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर फेकला गेल्याने टीम इंडियाचा सलामीचा फलंदाज शिखर धवन भावूक झाला आहे. धवनने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून आपल्या भावनांचा बांध मोकळा केला आहे.

शिखर धवनने ट्विटरवर भावूक पोस्ट शेअर केली आहे. ‘वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धा 2019 मधून बाहेर गेल्याचे जाहीर करताना मी भावूक झालो आहे. दुर्दैवाने डाव्या हाताला झालेली दुखापत बरी झालेली नाही. परंतु शो मस्ट गो ऑन..!’, असे व्हिडीओ ट्वीट शिखरने शेअर केले आहे. तसेच मी स्वत:ला भाग्यवान समजतो की संघातील खेळाडू, क्रीडाप्रेमी आणि संपूर्ण देश माझ्यामागे उभा राहिला आणि मला पाठिंबा दिला. जय हिंद! असे कॅप्शन धवनने दिले आहे.

वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना टीम इंडियाच्या गब्बरला दुखापत झाली होती. बोटाला झालेल्या दुखापतीनंतरही धवन मैदानावर शड्डू ठोकून उभा राहिला आणि त्याने 117 धावांची शतकी खेळी केली. परंतु सामना संपल्यानंतर त्याची दुखापत गंभीर असल्याचे जाहीर करण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या