शिखर धवन वर्ल्डकपमधून आऊट, ऋषभ पंतचा टीम इंडियात समावेश

virat-kohli-shikhar-dhawan

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

वर्ल्डकप स्पर्धेत ओव्हलच्या मैदानात ऑस्ट्रेलिया विरोधात तडाखेबंद खेळी करत 117 धावा ठोकणाऱ्या शिखर धवनला आपल्या अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे बाहेर जावे लागणार आहे. त्याच्या जागी ऋषभ पंतला टीममध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.

भारतीय संघ व्यवस्थापनाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (बीसीसीआय) धवनच्या जागी ऋषभ पंतला घेण्याची मागणी केली आहे. एक्से रेमध्ये शिखरच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झाल्याचे समोर आले नव्हते त्यामुळे तो 4 आठवड्यात पुन्हा फीट होईल अशी शक्यता होती. मात्र सिटी स्कॅनच्या रिपोर्टमध्ये शिखरच्या अंगठ्याला हेअर लाईन फ्रॅक्चर असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्याला विश्रांतीसाठी आणखी काही काळ लागेल. अखेर बीसीसीआयने आयसीसीला पत्र लिहून धवनच्या जागी ऋषभ पंतला सहभागी करून घेण्यासाठी परवानगी द्यावी अशी विनंती केली आहे.

ऋषभ पंत हा आधीच इंग्लंडमध्ये हजर झाला आहे. मात्र नियमांनुसार त्याला टीमच्या ड्रेसिंगरुम मध्ये जाता येत नव्हते. आता मात्र अधिकृतरित्या त्याला संघात स्थान मिळेल.

आयपीएलच्या सवयीमुळेच दुखापतींचा धोका वाढला – बसू

शिखर धवन अंगठय़ाला झालेल्या दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर गेला. टीम इंडियाचे ट्रेनर शंकर बसू यांनी धवनच्या दुखापतीचे खापर आयपीएलवर फोडले आहे. खेळाडूंना आपल्या झोपेच्या वेळा, योग्य झोप, सकस आहार आणि तंदुरुस्ती याची जाणीव असते. पण आयपीएल स्पर्धेदरम्यान खेळाडू मध्यरात्री 2 किंवा 3 वाजता झोपायचे. त्यानंतर सकाळी पुन्हा वेळेत सराव सत्रात हजर राहाणे हे त्यांना अत्यंत कठीण व्हायचे. त्याच सवयीमुळे धवनला गंभीर दुखापत झाली असावी असे मला वाटते असे बसू म्हणाले.