शिखर गौरीशंकर

65

डॉ. विजया वाड

गो, अहंकार, दुराभिमान या काही गोष्टी सोडल्या की शिल्लक राहतं ते निखळ प्रेम…आणि मग…

‘हयात’ हॉटेल हे काठमांडूचे फार प्रसिद्ध हॉटेल. वृंदा आणि भैरवी हयातमध्येच उतरल्या होत्या. आजची हेलिकॉप्टर राइड बघताना वृंदाला नॉस्टॅल्जिक व्हायला झालं. शिवबरोबर ती हनिमूनला इथेच तर आली होती. त्याच्या कुशीत बसून तिनं गौरी-शंकर नि माऊंट एव्हरेस्टचं शुभ्र हिमशिखर हेलिकॉप्टरमधूनच बघितलं होतं. किती सुवर्णवर्खी क्षण होते ते. किती वर्षे झाली? पंचवीस! हो… पंचवीसच.

तू तू मैं मैं…अहंकार या गोष्टी ज्यांना दूर सारता येत नाहीत त्यांचे संसार टिकत नाहीत. वृंदा नि शिव यांचेसुद्धा तेच झाले होते. एकमेकांशिवाय क्षणभरही न करमणारे जीव अहंकाराच्या विस्तवात भाजून विभक्त झाले होते. बापरे! नोकरी… अधिकार… बॉसगिरी यात पंचवीस वर्षे गेली?
‘‘काय गं? कुठे हरवलीस?’’ भैरवीने वृंदाला विचारले होते.
‘थोडय़ा आठवणी गं!’’
‘‘शिवबरोबरच्या?’
‘‘हं!’’ तिने भैरवीचा हात दाबला फक्त.
‘‘तुझं बरंय. लग्नच केलं नाही. एकला जीव मस्ता सदाशिव!’’ भैरवी म्हणाली. दोघी मजेत गप्पा मारत हॉटेलात शीतपेयाचे घोट घेत होत्या. अरे! यवढ्यात दरवाजात हॉटेलची स्वागतिका !
‘‘मॅडम, सॉरी टू बॉदर यू! पण आपण हिंदुस्थानात एका सिव्हिल हॉस्पिटलच्या प्रमुख मेडिकल ऑफिसर आहात ना?’’
‘‘हो. का पण? इज एनी वन सिक?’’
‘‘येस डॉक्टर. रूम नंबर ३२२ मध्ये येता?
‘‘चल. मी येते.’’ भैरवीला सांगून ती रूम नं. ३२२ मध्ये गेली. स्टेथो घेऊन नि गारच झाली. ‘‘शिव तू?’’ ती उद्गारली. राग, चिडचिड… सारे पापुद्रे वाऱ्यावर उडाले. काय झालं याला?
‘‘वृंदा… वृंदा… वृंदा…’’ त्याने वृंदाचा हात घट्ट धरला.
‘‘तू निघून गेलीस,.. मग मी आखाती देशात गेलो. ढीगभर कमावलं.’’
‘‘लग्न?’’
‘‘नाही केलं. तू?’’
‘‘अहं.’’
‘‘मग? इथे आल्यावर मी रेकी केली. गुगल सर्चवर सापडलीस. मग तुझ्या प्रोग्रॅमरशी मैत्री नि तुझ्यापाठोपाठ हयात हॉटेल. आता नको सोडूस मला. साऱ्या राग मत्सराचं विरेचन झालंय. प्लीज वृंदा! इट इज नेव्हर टू लेट. प्लीज.’’ तीनं स्वागतिकेला फोन केला. ‘‘पेशंट इज ऑलराइट नाऊ. डोंट कॉल एनीवन.’’ भैरवीला फोन केला. ‘‘ आज 322 मध्ये जेवण घेतेय. इथेच झोपेन. गुड नाइट.’’
आणि मग?

मग काय प्रिय वाचकांनो?
शिखर गौरीशंकर ३२२ मध्ये अवतरलं ना!

 

आपली प्रतिक्रिया द्या