कोकणात शिमगा दणक्यात साजरा

109

सामना ऑनलाईन । रत्नागिरी

हे बारा गावच्या,बारा वेशीच्या,बारा बावडीच्या,बारा नाक्याच्या,बारा गल्लीच्या बारा शहराच्या देवा महाराजा… आज जो शिमग्याचो सण सगळे पोरा टोरा ,म्हातारे-कोतारे, मिळानं साजरे करतत,त्यांचो तू नेहमी सांभाळ कर… जी काय इडा पीडा, वाकडा-नाकडा असात त दूर कर रे महाराजा…होय महाराजा …ग्रामदेवतेला अशी गाऱहाणी घालत कोकणात शिमगोत्सव आज दणक्यात पार पडला.रविवारी मध्यरात्री होम पेटवून जोरदार फाका देत शिमगा करण्यात आला. हुरा रे हुरा आमच्या भैरीबुवाला सोन्याचा तुरा रे …होरयो अशा फाका देत रत्नागिरी शहरातील बारा वाड्यांचा श्री भैरीबुवाचा शिमगोत्सव ही दिमाखात रंगला. रत्नागिरी जिल्हयात ३९५९ ठिकाणी शिमगोत्सव उत्साहात साजरा झाला.

फाक पंचमी पासून कोकणात शिमगोत्सवाची धूम रंगली आहे. मोठया संख्येने गावी आलेले चाकरमानी शिमगोत्सवात सहभागी झाले. ग्रामदेवतेच्या पालखीचे दर्शन, हातभेटीचा नारळ देणे तसेच नवसही फेडण्यात आले.चाकरमान्यांसह गावकरीही आपल्या ग्रामदेवतेच्या पालखीसमोर नतमस्तक झाले.

गावागावामध्ये शिमगोत्सव दणक्यात साजरा करण्यात आला. ढोल-ताशांच्या गजरात ग्रामदेवतेच्या पालख्यांच्या मिरवणूका निघाल्या. शिमगोत्सवात पालखी नाचवण्याचा सन्मानही ग्रामस्थांना लाभला. शिमगोत्सवात गावागावात जत्रेचे वातावरण निर्माण झाले होते. रत्नागिरी जिल्हयात ११५९  ठिकाणी सार्वजनिक आणि २८०० ठिकाणी खासगी शिमगोत्सव साजरा होत आहे तर ११०५ ठिकाणी पालखी उत्सव साजरा करण्यात आला. शिमगोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

रत्नागिरीतील बारा वाढ्याचा श्री देव भैरीबुवाचा शिमगोत्सवात भाविकांनी गर्दी केली. रविवारी मध्यरात्री १२ वाजता श्री देव भैरी मंदिरातून वाजत गाजत पालखी बाहेर पडली आणि तिच्या दर्शनासाठी हजारो हात उंचावले. आज पहाटे पासून श्रीदेव भैरीबुवाची पालखीची मिरवणूक वाजतगाजत शहरातून निघाली. दुपारी होळी तोडून मिरवणूक ढोलताशाच्या गजरात भैरीबुवाच्या जयजयकारात झाडगाव येथे पोहचली. सायंकाळी साडेचार वाजता पालखी सहाणेवर विराजमान झाली. त्यानंतर भाविकांना दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली.

आपली प्रतिक्रिया द्या