सण शिमग्याचा गो आलाय…

वसंताच्या आगमनाची चाहूल लागताच साजरा केला जाणारा सण म्हणजे होळी. निसर्गाशी असलेलं नातं या प्रथा-परंपरांमधून व्यक्त होतं. गावपातळीवर जपल्या जाणाऱया या संस्कृतीत होळीचं महत्त्व वेगळंच आहे. होळीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील विविध प्रथा-परंपरांचा घेतलेला हा वेध.

 गणेशोत्सवाप्रमाणेच कोकणात शिमगोत्सवाचे मोठे प्रस्थ असते. शिमगोत्सवासाठी  ग्रामदेवतांचा पालख्यांच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने चाकरमानी गावी येत असतात. शिमगोत्सवात पालखी नाचवण्याचा अभूतपूर्व सोहळाही रंगतो.

शिमग्याला गावकरी एकत्र येतात. शेवरी किंवा अन्य वृक्षाच्या फांद्यांची तोड करून वाजतगाजत त्या गावात आणल्या जातात. त्या फांद्यांची होळी उभी केली जाते. सलग दहा दिवस रात्री फाका देऊन शिमगोत्सव साजरा केला जातो. शेवटच्या दिवशी म्हणजे शिमग्याच्या दिवशी मध्यरात्री होम पेटवला जातो. यावेळी ग्रामदेवतेची पालखीही नाचवण्यात येते. पालखी नाचवणे हा एक सन्मान समजला जातो. कोकणामध्ये पालखी नाचवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. काही ठिकाणी दोन्ही खांद्यांवर घेऊन पालखी नाचवली जाते. अनेक ठिकाणी एक व्यक्ती डोक्यावर पालखी घेऊन ती नाचवते. पालखी नाचवणे हा एक सोहळाच असतो. रत्नागिरीतील फणसोप येथील श्रीदेव लक्ष्मीकेशवाचा शिमगोत्सव पालखी नृत्यामुळेच अधिक लोकप्रिय झाला. शिमगोत्सवाचे शेवटचे दोन दिवस या शिमगोत्सवातील पालखी नृत्य पाहण्यासाठी आजूबाजूच्या परिसरासह रत्नागिरी शहरातील लोक गर्दी करतात. रत्नागिरीतील बारा वाडय़ांचे ग्रामदैवत श्रीदेव भैरीबुवांचा शिमगोत्सवही खूप लोकप्रिय आहे. ‘हुरा रे हुरा, भैरीबुवाला सोन्याचा तुरा’ अशा फाका देत शिमग्याच्या आदल्या दिवशी मध्यरात्री श्रीदेव भैरीमंदिरातून पालखी निघते. यावेळी हजारो रत्नागिरीकर भैरीमंदिरात गर्दी करतात. ही पालखी वाजतगाजत मंदिरातून बाहेर पडते आणि शहरातून मार्गक्रमणा करत दुसऱ्या दिवशी झाडगाव येथील सहाणेवर येऊन बसते. त्यानंतर त्या ठिकाणी होळी उभी केली जाते. त्यानंतर पाच दिवसांनी रंगपंचमीच्या दिवशी श्रीदेव भैरीबुवांची पालखी सहाणेवरून उठते आणि सगळीकडे रंगांची उधळण केली जाते.

शिमग्याला मोठ्या प्रमाणावर चाकरमानी गावी येतात. यावेळी पालखीला हातभेटीचा नारळ दिला जातो तसेच नवसही फेडले जातात. शिमग्याचे आणखी एक आकर्षण म्हणजे सोंगं. शिमगा सुरू झाला की, सोंगेही नाचू लागतात. ‘आयनाच्या बायना घेतल्याशिवाय जायना, गल्ल्यात पैसा दिसतो हाय ना’ असं म्हणत संकासुर दुकानावर आणि दारावर नाचू लागतो. लोक स्वखुशीने यावेळी संकासुराच्या हातावर पैसे ठेवून दान देतात.

संस्थानी परंपरेतील आचऱ्यातील होळी

मालवण – परंपरेत साजरे होणारे सण, उत्सव अशी ओळख मालवण तालुक्यातील आचरा गावाची आहे. मार्च महिन्यात साजरा होणारा ‘देवहोळी’ व ‘गावहोळी’ हा उत्सव त्यापैकीच एक. पाच दिवस चालणाऱया या होळी उत्सवानिमित्त (शिमगोत्सव) इनामदार श्रीदेव रामेश्वर मंदिर व रवळनाथ मंदिर येथे विविध धार्मिक कार्यक्रम साजरे होतात. मंदिरातील मांडावर या कालावधीत होणारे शिमगोत्सवातील खेळ, विविध वेशभूषा केलेली पात्रे (सोंगा) हे प्रमुख आकर्षण असते.

holi-2

मालवण तालुक्यातील सर्वात मोठे गाव अशी आचरा गावाची ओळख आहे. येथील रामेश्वर मंदिरात साजऱया होणाऱया उत्सवांचा संस्थानी थाट अनोखा असतो. त्याच धर्तीवर अनेक वर्षांपासून असलेली परंपरा जोपासत होळी सणाच्या दिवशी रामेश्वर मंदिराजवळ देवहोळी उभारली जाते, तर दुसऱ्या दिवशी आचरा बाजरपेठेजवळ गावहोळी उभारली जाते. दोन्ही होळींसाठी पोफळीच्या (सुपारीच्या) झाडाचा वापर होतो. देवहोळीसाठी लगतच्या वायंगणी गावातून होळीचे झाड सवाद्य मिरवणुकीने आणले जाते, तर गावहोळीची मिरवणूक सरजोशी घराण्याच्या प्रमुख उपस्थितीत आणली जाते. पोफळीच्या झाडाला आंब्याची पाने व भगवा ध्वज लावला जातो. पूजा कार्यक्रम झाल्यावर नवस बोलणे-फेडणे आदी कार्यक्रम होतात. दोन व्यक्तींना नवरा-नवरीचे रूप देऊन गावात रोंबाट काढले जाते. रंगपंचमी खेळली जाते. यात सर्व वयोगटांतील व्यक्ती सहभागी होतात. शिमगोत्सवात शेवटच्या दिवशी मंदिरात विविध वेशभूषा करून आचरावासीय एकत्र येतात. गोमूचे नाच घेऊन गावात फिरतात आणि पाच दिवसांच्या शिमगोत्सवाची सांगता होते.

अनोख्या प्रथा जपणारा आमदोसचा उत्सव

सिंधुदुर्ग जिह्यातील होळी अर्थात शिमगोत्सव आगळावेगळा असतो. ग्रामीण लोककला ही कोकणची परंपरा अशी ओळख आहे. ही या उत्सवातून दिसुन येते. देवगड-विजयदुर्ग भागातील गावांमध्ये ‘हुडोत्सव’ या परंपरेनुसार होळी साजरी होती. होळीसाठी उभ्या केलेल्या झाडावर एक व्यक्ती चढत असते. गावकरी खालून फेकत असलेल्या वस्तूंचा मार चुकवत आणि तोल सांभाळत, तिला होळीच्या टोकाशी असलेले निशाण खाली आणायचे असते. ‘शिमगोत्सवा’त होळीच्या आदल्या दिवसापासून सुरू होते. होळी दिवशी गावातील अनेक वाडीत ग्रामस्थ एकत्र येत खड्डा खणून रात्री त्यात प्रतीकात्मक होळीच्या झाडाची पूजा करत त्यासोबत एकत्र गोळा केलेली लाकडे पेटवतात. होळी संपेपर्यंत जवळपास आठवडाभर जिह्याच्या सर्वच तालुक्यात मुखवटेधाऱयांकडून सोंगे रंगवण्यात येतात. ही सोंगे शबय (पैसे) मागत घरोघर फिरतात. होळी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी रंग खेळून धुळवड साजरी होते. तिथीनुसार रंगपंचमी साजरी करूनच होलिकोत्सवाची सांगता होते. प्रत्येक गावातील ग्रामदैवताचे उत्सवात महत्त्वाचे स्थान असते. देवांची निशाणे वाद्यासह फिरवली जातात.

holi-3

मालवण तालुक्यात आमडोस गावाच्या होळीची वेगळी ओळख आहे. प्रतीकात्मक लग्न लावले जाते. यात सर्व लग्न विधी होतात मात्र त्या उलटय़ा. गावातील सर्व मंडळी एकत्र येत साजरी होणारी ही परंपरा अनोखी म्हणावी लागेल. अनेक गावात अशा अनोख्या परंपरा जोपासत होळी साजरी होते. सिंधुदुर्गच्या लगत असलेल्या गोवा राज्यातही हा उत्सव साजरा होतो. तेथील प्रथा काही प्रमाणात सिंधुदुर्गातील होळी उत्सवाप्रमाणे असतात. तर काही ठिकाणी पाटर्य़ा, मजा मस्ती केली जाते. एकूणच आनंदाचा मजामस्तीचा असा हा उत्सव ओळखला जातो.

संकलन – अमित खोत , भरत काळे , दुर्गेश आखाडे