कुठे साजरा होतो पेटती लाकडे फेकून मारत शिमगोत्सव, वाचा….

जे . डी . पराडकर । संगमेश्वर

कोकणात साजऱ्या करण्यात येणाऱ्या विविध सणांमध्ये ग्रामदेवतेच्या शिमगोत्सवाला जेवढं महत्व आहे तेवढे खचितच अन्य सणांना असेल. या शिमगोत्सवासाठी चाकरमान्यांचे आगमन होण्यास सुरुवात झाली असून येत्या चार दिवसात कोकणात सर्वत्र शिमगोत्सवाचा सोहळा पारंपारिक पध्दतीने आणि भक्तीपूर्ण वातावरणात रंगणार आहे.

शिमगोत्सव म्हणजे ग्रामदेवतेचा गजर. फाकपंचमी पासून आबालवृध्दांमध्ये एक अनामिक जोश निर्माण होतो. ग्रामदेवतेचा जयजयकार करताना शिमगोत्सवात प्रत्येक गावच्या प्रथा जरी वेगळ्या असल्या तरी सर्वांचा उद्देश आपल्या ग्रामदेवतेपुढे नतमस्तक होणे एवढाच असतो. शिमगा आणि मानपान यांचं खूप जुने आणि भावनिक नातं आहे. पूर्व परंपरापार चालत आलेल्या मानपानात बदल होत नाहीत. यामध्ये काही मागेपुढे झालं तर, या उत्सवात गालबोट लागण्याचीही शक्यता असते . नेमून दिलेल्या जबाबदाऱ्या सुरळीत पार पडल्या, की हा उत्सव उत्तरोत्तर रंगत जातो. कोकणच्या ग्रामीण भागात शिमगोत्सवाच्या आधी लग्न विधींचे मुहूर्त घेण्याची प्रथा असल्याने फाक पंचमीपासून गावागावातून उत्साहाचे वातावरण असते. नव्याने लग्न झालेले जोडपे होळीच्या भोवती प्रदक्षिणा घालून होमात श्रीफळ अर्पण करतात. असे श्रीफळ अर्पण केल्याशिवाय जणू लग्नविधी पूर्णत्वास जात नाही एवढी नितांत श्रध्दा यामागे असते.

गावाची वेस बदलली की शिमगोत्सव साजरा करण्याची प्रथा बदलते. रत्नागिरी जिल्ह्याच्या विविध भागातील शिमगोत्सवाच्या आगळ्यावेगळ्या प्रथा अक्षरशः अचंबित करणाऱ्या आहेत. भक्तगणांनी अज्ञात स्थळी जमिनी खाली पुरुन ठेवलेल्या खुणा पालखी शोधून दाखवते. हा सोहळा म्हणजे नितांत श्रध्देवर आरुढ झालेल्या भक्तिमय वातावरणाचा एक अनोखा संगम असतो. जमिनीत पुरुन ठेवलेल्या खुणेजवळ पालखी आली की ती एवढी जड होते की, खुणे जवळ पालखीचा खूर आपटतो. त्या ठिकाणी खणल्यावर लपविलेली खुण सापडली की, उपस्थित हजारो भक्तगणांकडून ग्रामदेवतेच्या नावाचा जयजयकार केला जातो. एक प्रकारे भक्ताने देवाच्या परवानगीनेच त्याची परीक्षा बघण्याचा हा सोहळा असतो. खुण शोधण्याच्या प्रथेमुळे भक्तगणांचा ग्रामदेवतेवरील तसेच या उत्सव परंपरेवरील विश्वास अधिक दृढ होत असतो. चिपळूण, लांजा आणि रत्नागिरी तालुक्यात पालख्यांकडून खुणा शोधण्याचे सोहळे संपन्न होतात .

चिपळूण तालुक्यातील सावर्डे परिसरात साजरा होणारा होल्टे होम हा एक असाच चकीत करणारा शिमगोत्सवातील प्रकार आहे. होम पेटविण्याच्या दरम्यान एकमेकांवर पेटती लाकडं फेकून मारली जातात. विशेष म्हणजे या प्रकारात कोणाला काही इजा होत नाही. या आगळ्या प्रथांदरम्यान आपल्या भक्ताची काळजी घेण्याची जबाबदारी जणू ग्रामदेवतेवर असते आणि ती प्रत्येक वर्षी सुरळीत पार पाडली जाते. संगमेश्वर तालुक्यातील कडवई घोसाळकर कोंड येथे होळीचा माड उभा करताना त्याला हात न लावण्याची प्रथा आहे. जमिनीवर आडवा असणारा हा माड शकडो भक्तगण काठीच्या सहाय्याने उचलतात आणि मोठ्या कल्पकतेने काठ्यांचा आधार देतच उभा करतात. ढोल ताशांचा आणि ग्रामदेवतेच्या नावाचा गजर भक्तगणांमध्ये अनामिक शक्ती निर्माण करत असतो .

ढोल हे शिमगोत्सवातील प्रमुख वाद्य . ढोलावर थाप पडली की त्या नादाने भक्तांचे पाय आपोआप थिरकायला लागतात . ढोलांचा आवाज आला की, भक्तगण घरातून नकळत बाहेर पडतोच. गावच्या ग्रामदेवता मंदिराजवळ गावची सहाण असते . याच ठिकाणी रुप लागलेल्या ग्रामदेवतेच्या मुर्ती पालखीत विराजमान झालेल्या असतात. कोकणात दोन प्रकारचे शिमगोत्सव साजरे होतात. त्रयोदशीच्या शिमग्यांना तेरसे तर पौर्णिमेच्या शिमग्यांना भद्रेचे शिमगे असे म्हटले जाते. बहुसंख्य गावातून सहाणेजवळ उभा करायचा माड म्हणून आंब्याचं मध्यम आकाराचं झाड निवडलं जातं, तर काही गावातून सुरमाड किंवा पोफळ उभी करण्याची परंपरा आहे. संगमेश्वर तालुक्यातील आंबेडखुर्द गावात पौर्णिमेच्या रात्री स्वच्छ पिठूर चांदण्यात साजरा होणारा शिमगोत्सव सोहळा दृष्ट लागण्यासारखा असतो. हा संपूर्ण सोहळा अन्य कोणत्याही प्रकाशाविना केवळ चांदण्याच्या स्वच्छ प्रकाशात संपन्न होतो. या शिमगोत्सवाची महती एवढी आहे की, येथे कोणत्याही प्रकारची नशा करुन आलेलं चालत नाही. संगमेश्वर नजिकच्या करंबेळे गावात संपन्न होणारा शिमगोत्सव म्हणजे शिवने आणि करंबेळे येथील दोन पालख्यांची गळा भेट असते. नजिकच्या वांद्री गावात पालख्यांची भेट नदी पात्राच्या मध्यभागी होते. हा आगळावेगळा सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविक गर्दी करतात .

फाक पंचमीला गावातील दहा – पंधरा मुलांचा समुह होळीच्या ठिकाणाजवळ एकत्र येतो. रोजच्या साठी चिव्याची होळी आणली जाते. ही होळी सायंकाळी उभी केली की, उर्वरीत सोपस्कार रात्रीच्या अंधारात पार पाडले जातात. रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घरातील एक याप्रमाणे सर्व मंडळी होळीजवळ जमून सर्व नियोजन करतात. होळी आणि चोरी यांचंही एक अतूट नातं आहे. या कालावधीत कवळ, लाकडं, कलिंगडं, पावट्याच्या शेंगा, नारळ यासारख्या गोष्टी चोरुन आणून रात्रीच यासर्व वस्तूंचा फडशा पाडण्याची एक प्राचिन पध्दत आहे. समुहातील अन्य मंडळी आवश्यक चिज वस्तू घेऊन येइपर्यंत उर्वरीत मंडळी होळीजवळ आट्यापाट्यांचा प्राचिन खेळ खेळत असतात. खाण्याच्या वस्तूंची चोरी यामागील उद्देश गुन्हेगारी स्वरुपाचा नसल्याने अशा चोऱ्यांकडे सर्रास दुर्लक्षच केले जाते .

नोकरी व्यवसायानिमित्त दुरवर असणारा कोकणातील माणूस शिमगोत्सावासाठी आवर्जून घरी येतो. ग्रामदेवतेपुढे नतमस्तक होणे, पालखी आपल्या घरामध्ये घेऊन देवीची ओटी भरणे आणि सालाबादच्या रखवालीचा नारळ अर्पण करणे हा एकमेव भक्तीमय उद्देश यामागे असतो. शिमगोत्सवात नमनखेळे, गोमू, संकासूर अशा विविध नृत्य प्रकारांचीही रेलचेल असते . पालखी आधी किंवा नंतर खेळे, संकासुर घरोघरी जाऊन पोस्त घेतात. फाक पंचमी पासून कोकणात ढोल वाजू लागल्याने शिमगोत्सवाचा ज्वर चढू लागला असून चाकरमान्यांच्या मांदीयाळीला सुरुवात झाली आहे. पुढील २० दिवस केवळ ग्रामदेवतेच्या जयजयकाराचेच आवाज कोकणच्या कडेकपारीत घुमणार आहेत .

 

आपली प्रतिक्रिया द्या