शिंदे गटाच्या माणसाचा प्रताप; पाटण येथे ठाण्याचा माजी नगरसेवक मदन कदम याचा अंदाधुंद गोळीबार, 2 ठार; 1 जखमी

मिंधे गटाचा ठाण्यातील माजी नगरसेवक मदन कदम याने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात दोघे जागीच ठार, तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. ही धक्कादायक घटना पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्या पाटण तालुक्यात रविवारी रात्री घडली. या घटनेने कायदा सुव्यवस्थेचे पुन्हा धिंडवडे निघाले असून, सातारा जिल्हा हादरून गेला आहे. पाटण तालुक्यात तणाव आहे. दरम्यान, आरोपी मदन कदम हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जवळचा माणूस असल्याची माहिती आहे.

श्रीरंग लक्ष्मण जाधव (वय 47) आणि सतीश बाळासाहेब सावंत (वय 35, रा. कोरडेवाडी, ता. पाटण) अशी गोळीबारात ठार झालेल्यांची नावे आहेत. तर प्रकाश लक्ष्मण जाधव हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर कराड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर संतप्त जमावाने आरोपी मदन कदम याच्या शेतावरील घराला वेढा घातला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी मदन कदम याच्यासह त्याची पत्नी नीता, मुले गौरव आणि योगेश यांना अटक केली. पाटण न्यायालयाने त्यांना 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

शंभूराज देसाई हे साताऱयासह ठाणे जिह्याचेही पालकमंत्री आहेत. योगायोग म्हणजे मदन कदम हा मूळचा पाटण तालुक्यातील कदमवाडीचा असून, ठाण्याचा माजी नगरसेवक आहे. कदम सध्या मिंधे गटात कार्यरत आहे. कदम याचे मोरणा खोऱयातील गुरेघर धरण परिसरात फार्म हाऊस आहे. पवनचक्कीच्या व्यवहारातील देवाण-घेवाणवरून ही थरारक घटना घडल्याचे सांगितले जात होते. तथापि, त्यानंतर आणखी एक कारण पुढे आले आहे. मदन कदमच्या मुलाने दोन दिवसांपूर्वी केलेल्या भांडणाचा विषय मिटवण्यासाठी कदमने फार्म हाऊसवर या लोकांना बोलावले होते. त्यावेळी मदन कदम याने रिव्हॉल्व्हरने तिघांवर बेछूट गोळीबार केला.

चार दिवसांपूर्वी दिली होती धमकी

पाटण तालुक्यातील मोरणा विभागातील कोरडेवाडी येथे झालेल्या शाब्दिक चकमकीतून सखाराम निवृत्ती जाधव यांना मदन कदम याच्यासह त्याची मुले गौरव कदम व योगेश ऊर्फ सोनू कदम यांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी चार दिवसांपूर्वी पाटण पोलिसांत कदम पिता-पुत्रांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 15 मार्च रोजी दुपारी गुरेघरकडे जाणाऱया रस्त्यावरील भवानी मंदिर येथे वाहनांवरून वादावादी झाली होती. त्यावेळी संशयितांनी सखाराम जाधव यांना मारहाण व शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकीही दिली. याचवेळी अजित साळुंखे यांच्या वाहनाची मागील काचदेखील फोडल्याची तक्रार सखाराम जाधव यांनी पाटण पोलिसांत दिली आहे. त्यातूनच गोळीबार झाल्याचा संशय आहे.