शिरढाणे ग्रामपंचायतीत दीड कोटीचा अपहार; सरपंच, ग्रामसेवकांवर कारवाई करा

1142

तालुक्यातील शिरढाणे ग्रामपंचायतीचा कारभार करताना सरपंच आणि ग्रामसेवकाने एक कोटी 60 लाखांचा गैरव्यवहार केला आहे. दोघांनी त्यांच्या नातेवाईकांच्या नावे धनादेश वठविले आहेत. त्याबाबत सबळ पुरावे आहेत. जिल्हा परिषद प्रशासनाने आदेश देऊनदेखील गटविकास अधिकारी दुर्लक्ष करीत आहे. एक महिन्याच्या आता कारवाई झाली नाही तर जिल्हा परिषदेच्या आवारात मी आत्मदहन करणार आहे असे स्पष्टीकरण सामाजिक कार्यकर्ते गणेश सोनवणे यांनी दिले.

गाव हा विकासाचा केंद्रबिंदू निश्चित करून शासनाच्या अनेक योजना राबविल्या जातात. पण ग्रामपंचायतीचा कारभार करताना सरपंच आणि ग्रामसेवक परस्पर संगनमताने गैरव्यवहार करतात अशा अनेक तक्रारी आहेत. त्यात शिरधाने ग्रामपंचायतीची भर पडली आहे. सामाजिक कार्यकर्ते गणेश सोनवणे यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली. शिरढाणे ग्रामपंचायतीत 2015 पासून गैरव्यवहार केले जात आहेत. सरपंच आणि ग्रामसेवक यांनी त्यांच्या नातेवाईकांच्या नावे धनादेश देऊन बँकेतून पैसे काढून घेतले आहेत. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱयांकडे सबळ पुराव्यांसह तक्रार केली. मुख्य कार्यकारी अधिकाऱयांनी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱयांना कारवाई करण्याचे निर्देश दिलेत. पण गटविकास अधिकारी दुर्लक्ष करीत आहे. साहजिकच सरपंच आणि ग्रामसेवकांचा गैरव्यवहार सुरूच आहे. एक महिन्याच्या आत कारवाई झाली नाही तर मात्र मी जिल्हा परिषदेच्या आवारात जाऊन आत्मदहन करेल, असे गणेश सोनवणे यांनी सांगितले.

कोणताही गैरव्यवहार नाही सरपंच जिभाऊ पाटील यांचा दावा
शिरढाणे ग्रामपंचायतीचा कारभार करताना कोणताही गैरव्यवहार केलेला नाही. आरोप करणारा गणेश सोनवणे हा कथित सामाजिक कार्यकर्ते ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करतो. या पूर्वीच्या सरपंचावर त्याने आरोप केले होते. आमच्यावर केलेले आरोप जिल्हा न्यायालयात आणि उच्च न्यायालयात सिद्ध होऊ शकलेले नाहीत. गणेश सोनवणे याच्यावर निरनिराळे गुन्हे दाखल आहेत अशी माहिती सरपंच जिभाऊ पाटील यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

गावाच्या विकासासाठी थेट ग्रामपंचायत स्तरावर शासनाचा निधी येतो. सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या स्वाक्षऱयांनी लाभार्थ्यांना धनादेश दिले जातात. असे असताना शिरढाणे येथे आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप आहे. त्याचे स्पष्टीकरण सरपंच जिभाऊ पाटील यांनी दिले. गावात विकासकामे होत असताना कथित सामाजिक कार्यकर्ता गणेश सोनवणे हा अडथळे निर्माण करतो. ग्रामसेवकांकडे पैशांची मागणी करतो. आमच्या विरोधात केलेले आरोप तो जिल्हा न्यायालय आणि उच्च न्यायालयात सिद्ध करू शकलेला नाही. परिवहन महामंडळाकडून परीक्षा घेण्यात आली तेव्हा त्याने प्रश्नपत्रिकेचा गैरव्यवहार केला आहे. त्याबाबत पोलिसांत गुन्हा दाखल आहे. जळगाव येथेही सोनवणे याच्यावर गुन्हे दाखल आहेत. केवळ ब्लॅकमेल करणे हा त्याचा उद्योग आहे, असा दावा सरपंच जिभाऊ पाटील यांनी केला.

आपली प्रतिक्रिया द्या