विमानतळ विकासामध्ये पर्यटन, उद्योग, शहरविकासाचा दृष्टिकोन ठेवा!

423

पायाभूत सुविधांचा विकास एवढ्या मर्यादित दृष्टिकोनातून विमानतळांच्या विकासाकडे न पाहता त्या परिसरातील पर्यटन, उद्योग, शहरविकासाला चालना कशी मिळेल ही दूरदृष्टी ठेवली पाहिजे. शिर्डीची आध्यात्मिक पार्श्वभूमी लक्षात घेऊन तशाच संकल्पनेवर आधारित तेथील विमानतळ टर्मिनस इमारतीचे विस्तारीकरण करण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या (एमएडीसी) संचालक मंडळाची बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवनात झाली, त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले, शिर्डी विमानतळाच्या विकासामुळे तेथील धार्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळाली आहे. विदेशामध्ये धार्मिक ठिकाणचे विमानतळ पाहता तेथील आध्यात्मिक वैशिष्टय़े लक्षात घेऊन थीम बेस्ड पद्धतीने विमानळांचा विकास केल्याचे दिसून येते. राज्यातही शिर्डी, नांदेड विमानतळांसाठी थीम बेस्ड विकास पर्यटनवृद्धीसाठी उपयुक्त ठरेल. शिर्डी विमानतळ टर्मिनसचे विस्तारीकरण अशा पद्धतीने करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाबरोबर (एमटीडीसी) समन्वयाने काम करावे. शिर्डी विमानतळावर ‘नाइट लँडिंग’ची सुविधा एप्रिलपासून कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, असे निर्देशही त्यांनी दिले.

यावेळी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव अजोय मेहता, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव आशीष कुमार सिंह, सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव कल्सा नायर-सिंह, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव आय. एस. चहल, उद्योग विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी आदी अधिकारी उपस्थित होते.

चिपी विमानतळाचे काम जलदगतीने पूर्ण करा!

विमानतळांचा विकास करताना तेथील शहरांशी चांगली दळणकळण यंत्रणा (कनेक्टिव्हिटी), मार्गावरील उद्योग, शहरविकासासाठी नगर नियोजन तसेच परिसरातील पर्यटन विकास साध्य करण्यासाठी नगरविकास विभाग, सिडको, एमएडीसी, एमटीडीसी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) यांनी समन्वयाने काम करावे. चिपी विमानतळ (जि. सिंधुदुर्ग) लवकरात लवकर कार्यान्वित होईल यासाठी जलदगतीने कार्यकाही करा. तसेच या विमानतळालगतच्या परिसराचे नियोजित पद्धतीने शहर नियोजन करावे.

आपली प्रतिक्रिया द्या