शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची शिर्डीत बैठक, शिर्डी नगरपंचायत, राहाता पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी

 

आगामी शिर्डी नगरपंचायत व राहाता नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या माध्यमातून मोर्चेबांधणीस सुरुवात करण्यात आली आहे. आज शिर्डीत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यात भाजपला म्हणजेच विखे गटाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी तिन्ही पक्षांनी व्यूहरचनेला सुरुवात केली आहे.

शिर्डी नगरपंचायत आणि राहाता नगरपालिकेची निवडणूक अवघ्या आठ महिन्यांवर येऊन ठेपली आहे. या दोन्ही निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून थोरात गटाने यापूर्वीच तालुक्यातील कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती. या पाठोपाठ युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी शिर्डीत शिवसेनेचे कमलाकर कोते, संजय शिंदे, सचिन कोते, राष्ट्रवादीचे नीलेश कोते, अमित शेळके, तर काँग्रेसचे सचिन चौगुले, दिलीप कोते, प्रसाद शेळके, रवि कोते यांच्याबरोबर आगामी निवडणुकांसंदर्भात प्राथमिक चर्चा केली.

शिर्डीत विखे गटाची एकहाती सत्ता असून, राहात्यात भाजपच्या पिपाडा गटाची सत्ता असली, तरी विखे गटाच्या नगरसेवकांच्या पाठिंब्यामुळेच ती टिकून आहे. त्यामुळे दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्था भाजपच्या ताब्यात आहेत. त्यामुळे या निवडणुकीत विखे विरोधकांना एकत्र करून महाविकास आघाडीचे स्वतंत्र पॅनल उभे करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यादृष्टीने राहाता व शिर्डीत काँग्रेसकडून विविध कार्यक्रम राबवून वातावरण तयार करण्याचा प्रयत्न मागील विधानसभेचे उमेदवार सुरेश थोरात यांच्यामार्फत केले जात आहे. आमदार सुधीर तांबे व आता सत्यजित तांबे हे दोन्ही नेते यावर लक्ष ठेवून आहेत.

सत्यजित तांबे म्हणाले, राहाता व शिर्डी नगरपंचायतीच्या निवडणुका सर्वांना बरोबर घेऊन लढवू. जनतेच्या प्रश्नांवर सर्वांनी आवाज उठवावा. आयुष्यभर विखेंना विरोध करणारे अशीच पिपाडा यांची ओळख होती. त्याच विखेंना शरण गेल्याने त्यांना जनता कधीही माफ करणार नाही. ही आघाडी लोकांना आवडलेली नाही. राहाता मतदारसंघात भाजपविरोधात तीव्र रोष आहे. त्यामुळे सर्व विरोधकांची मोट बांधून जनतेला विश्वास द्यावा लागेल, त्यासाठी सर्वांनी कामाला लागण्याचे आवाहन सत्यजित तांबे यांनी केले.

यावेळी सुरेश थोरात, सचिन चौगुले, दिलीप कोते, रमेश गागरे, नवनाथ महाराज आंधळे, विक्रांत दंडवके, प्रशांत कोते, सुभाष निर्मळ, राहाता शहराध्यक्ष नितीन सदाफळ, राजेंद्र निर्मळ, सचिन गाडेकर, पंकज लोंढे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या