शिर्डी संस्थान देणार पुरग्रस्तांना 10 कोटी रुपये, संस्थानचा दिवाणी अर्ज मंजूर

344

सांगली आणि कोल्हापूर येथील पुरग्रस्तांना मुख्यमंत्री सहायत्ता निधीत दहा कोटी रुपयाचा निधी देण्यास मान्यता देण्यात यावी अशा अशायाचा दिवाणी अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर येथील खंडपीठात दाखल करण्यात आला होता. न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे आणि न्यायमूर्ती आर. जी. अवचट यांनी अर्ज मंजूर केल्यामुळे निधी देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

श्री साईबाबा संस्थान शिर्डीच्या वतीने सांगली व कोल्हापूरच्या पूरग्रस्तांसाठी मदत पुरविण्यासाठी निधी व इतर सामग्रींसाठी खंडपीठाची परवानगी मिळावी यासाठी संस्थानच्या वतीने अ‍ॅड. नितीन भवर पाटील यांच्यावतीने दिवाणी अर्ज दाखल करण्यात आला होता. दहा कोटीचा रुपये मुख्यमंत्री सहायता निधीस देण्यास मान्यता देण्यात यावी, 25 डॉक्टरांचे पथक आणि दहा लाख रूपयांची औषधी, एक रूग्णवाहिका आदी मदत देण्यास तयार असून यासाठी खंडपीठाने परवानगी द्यावी अशी विनंती करण्यात आली होती.

या दिवाणी अर्जावर सुनावणी दरम्यान खंडपीठाने सांगली आणि कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना प्रत्येकी एक कोटी रूपयांचा निधी महापुरात दगावलेल्या मुक्या प्राण्यांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी द्यावेत असे सूचित केले. जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निधीचा उपयोग केवळ मुक्या प्राण्यांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी करावा असेही स्पष्ट बजावण्यात आले आहे. संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांनी पशुसंवर्धन विभाग, वनविभाग यांच्यासह पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या मदतीने मुक्या प्राण्यांवर अंत्यसंस्कार करण्यात यावे असेही सूचित केले आहे. मदतीचा अहवाल दहा आठवड्यात खंडपीठासमोर सादर करण्यात यावा असेही निर्देश खंडपीठाने दिले आहेत. संस्थानच्या वतीने अ‍ॅड. नितीन भवर, अ‍ॅड. वसंत शेळके यांनी काम पाहिले, शासनाच्या वतीने सहाय्यक सरकारी वकील सिद्धार्थ यावलकर, मुळ याचिकाकत्र्यांच्या वतीने अ‍ॅड. प्रज्ञा तळेकर, अ‍ॅड. उमाकांत आवटे, अ‍ॅड. आदित्य काळे आदींनी काम पाहिले.

आपली प्रतिक्रिया द्या