मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची यशस्वी मध्यस्थी; शिर्डीकरांचे आंदोलन मागे

954

साईबाबांच्या जन्मस्थळावरून निर्माण झालेल्या वादावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यशस्वी तोडगा काढला. ग्रामस्थांनो श्रद्धा आणि सबुरी ठेवा. जन्मस्थळाचा वाद कशासाठी? संभाजीनगर येथे झालेल्या बैठकीत आपण पाथरीच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला मंजुरी दिली आहे. त्यानुसार तीर्थक्षेत्र म्हणूनच पाथरीचा विकास होईल, अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिर्डी ग्रामस्थांसोबतच्या बैठकीत मांडली. मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेत विकास आराखड्यातून जन्मस्थळाचा उल्लेख वगळल्याने समाधानी झालेल्या शिर्डी ग्रामस्थांनी पुकारलेला बेमुदत बंद मागे घेतला आणि वाद संपला.

पाथरी तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 100 कोटींच्या विकास निधीची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. विकास आराखडय़ाच्या नावात जन्मस्थळ असा उल्लेख आल्याने शिर्डीकरांनी शनिवारी रात्रीपासून बेमुदत बंद पुकारला. 25 गावांनी उत्स्फूर्त बंद पाळत कामकाज ठप्प केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिर्डीकरांसोबत सकारात्मक चर्चेचे आश्वासन दिल्याने रविवारी सायंकाळी हा बंद तात्पुरता मागे घेण्यात आला होता. त्यानुसार सोमवारी सह्याद्री अतिथी गृह येथे मुख्यमंत्री आणि शिर्डी ग्रामस्थांमध्ये बैठक पार पडली. बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पकार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार सदाशिक लोखंडे, आमदार राधाकृष्ण किखे-पाटील, शिर्डी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर आदींसह शिर्डी ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिर्डीकरांच्या भावना ऐकून घेतल्या. ग्रामस्थांच्या वतीने भूमिका मांडताना आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांनी यापूर्वी जन्मस्थळाबाबत शासनाची कुठलीच भूमिका नव्हती. अशीच भूमिका आता असावी, असा मुद्दा मांडला.

पाथरी तीर्थक्षेत्र विकासास शिर्डीकरांची हरकत नाही

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ग्रामस्थांच्या भावना विचारात घेऊन तीर्थक्षेत्र म्हणूनच पाथरीचा विकास करण्यात येईल, असे आश्वासन दिले. मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेवर समाधान झालेल्या शिर्डीच्या ग्रामस्थांनी पाथरीच्या तीर्थक्षेत्र विकास आराखडय़ास आमची हरकत नसल्याचे बैठकीत जाहीर केले. तसेच शिर्डी बेमुदत बंदही मागे घेत असल्याचे जाहीर केले.

आपली प्रतिक्रिया द्या