जीव धोक्यात घालून कर्मचाऱ्यांना वाचविणारेच रुग्णालयात

800
file photo

शिरपूर तालुक्यातील वाघाडी शिवारात रुमित केमिकल कंपनीत झालेल्या स्फोटात 14 जणांचा बळी गेला. आपत्ती निवारण पथकाने अनेकांचे प्राण वाचले यात सुमारे 72 जण उपचार घेत असून आणखी 34 जण आपत्ती निवारण पथकातील आहेत. डोळे चुरचुरणे, चेहरा सुजणे, मळमळ होणे असा त्रास या सदस्यांना होत आहेत. याबाबतची माहिती शासकीय पातळीवरून दडविण्याचा प्रयत्न होत आहे.

आपत्ती निवारणासाठी जिल्हय़ात स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात आला असून अनेक जणांना नैसर्गिक आपत्तीत मदत करता यावी म्हणून प्रशिक्षणार्थी कर्मचारी तयार करण्यात आले आहेत. वाघाडी येथे 31 ऑगस्टला रुमित केमिकल्समध्ये स्फोट झाला. आपत्ती निवारण विभागाचे पथक कामगारांच्या मदतीला धावले. तब्बल 72 जणांना मृत्यूपासून वाचवीत रुग्णालयात दाखल करण्यात आले. आपत्ती निवारण विभागाचे कौतुक झाले, पण माघारी परतल्यानंतर आपत्ती निवारण विभागाच्या कर्मचाऱ्यांना त्रास होऊ लागला. डोळे चुरचुरणे, श्वसनाचा त्रास होणे, मळमळ होणे, चक्कर येणे अशा तक्रारी अनेकांकडून झाल्या. परंतु या प्रकाराची कुठेही वाच्यता होऊ नये म्हणून प्रारंभी दुर्लक्ष करण्यात आले. अखेरीस अकरा जण साक्री रोडवरील खासगी रुग्णालयात दाखल झाले. प्रसार माध्यमांनी माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता तेथे प्रतिबंध करण्यात आला. एवढेच काय रुग्ण म्हणून दाखल झालेले आपत्ती निवारण विभागाचे कर्मचारी कुठलीही प्रतिक्रिया देण्यास तयार नव्हते. वरिष्ठ नाराज होतील अशी भीती या कर्मचाऱ्यांना आहे.

खासगी रुग्णालयात अकरा जण दाखल झाले आहेत. पण केवळ पाच जणांची नावे समजली. अन्य सहा जणांची नावेदेखील सांगण्याचे औदार्य रुग्णालय प्रशासनाने दाखविले नाही. उपचार घेत असलेल्यांपैकी भीमा राठोड यांची प्रकृती जास्तच बिघडली. त्यामुळे त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. खासगी रुग्णालयात अन्य चार जण उपचार घेत आहेत. त्यात सोनल चौधरी, विकास ढमाले, तौसिफ खाटीक, विजय ब्राम्हणे यांचा समावेश आहे.हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार घेणाऱयांमध्ये पोलीस उपनिरीक्षक सोनटक्के, एस.के.महाले, योगेश बडगुजर, एस.व्ही.साळुंके, लीलाधर सोनवणे, महेंद्र कोळी, भूपेंद्र वाघ, रामदास धांडे, स्वप्नील पाटील, समाधान पाटील, कमलेश महाजन, समाधान महाजन, नीलेश पाटील, राहुल आवचर, नरेहा पावरा, सागर भंडारकर, राहुल गरुड, किशोर महाजन, समाधान महाजन, सुहास झिंबळे, अमी फ्रान्सिस, सुनिता खरे, सुमित्रा खानकरी यांचा समावेश आहे.

आपली प्रतिक्रिया द्या