ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराला प्रेयसीने भररस्त्यात कानाखाली मारली

ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू आणि संघाचा माजी कर्णधार रात्री उशिरा उघडावागडा फिरताना दिसला. अंगावर फक्त हाफ पँट आणि पायात स्पोर्ट शूज घातलेल्या या क्रिकेटपटूला बघून आजूबाजूची मंडळी अवाक झाली होती. त्यांना त्याहूनही धक्का देणारी गोष्ट होती ती म्हणजे त्याच्या प्रेयसीने सगळ्यांच्या देखत त्याला सणसणीत कानाखाली मारली. हा माजी क्रिकेटपटू तिची विनवणी करत तिच्या मागे धावत होता, मात्र ती अजिबात ऐकायला तयार नव्हती.

ही घटना 10 जानेवारीची असल्याचं सांगण्यात येत आहे. क्विन्सलँडमधल्या सनशाईन समुद्रकिनाऱ्यावर ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मायकल क्लार्क हा ‘द टुडे शो’चा सूत्रसंचालक कार्ल स्टेफानोविकसोबत सुट्टीसाठी गेला होता. या दोघांसोबत क्लार्कची प्रेयसी आणि कार्लची बायको जॅस्मिनही होत्या. या दोघी सख्ख्या बहिणी आहेत. रात्री जेवत असताना वादाला सुरुवात झाली. वादाचं कारण होतं मायकल क्लार्कने तिच्या पूर्वाश्रमीच्या प्रेयसीला पाठवलेले मेसेज. पिप एडवर्डस असं त्याच्या पूर्वाश्रमीच्या प्रेयसीचं नाव असून ती एक प्रख्यात फॅशन डिझायनर आहे. या दोघांमधल्या संभाषणाबाबत मायकल क्लार्कची सध्याची प्रेयसी जेड यारब्रोला कळालं होतं. तिने याबद्दल क्लार्कला जाब विचारला आणि तिथेच वादाला सुरुवात झाली.

द डेली मेलने दिलेल्या वृत्तात म्हटलंय की, जेड क्लार्कवर ओरडत असताना म्हणाली होती की त्याने पिप एडवर्डसोबत 17 डिसेंबरला सेक्स केला होता. क्लार्कने मात्र हे चुकीचं असून आपण त्यादिवशी घरीच होतो असं म्हणत स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. यामुळे जेड तिथून निघून गेली. तिचा पाठलाग करत मायकल उघड्या अंगाने रस्त्यावर धावत होता. त्याने जेडला गाठलं असता जेडने त्याला भररस्त्यात सगळ्यांच्या देखत कानाखाली मारली असं या वृत्तात म्हटलं आहे.