क्षुल्लक कारणावरून हाणामारीमुळे शिरूर अनंतपाळ शहरात अघोषीत संचारबंदी

3204

शिरूर अनंतपाळ शहरातील गांधी चौकात दि २० सप्टेंबर रोजी रात्री ९ च्या सुमारास क्षुल्लक कारणावरून सुरु झालेल्या भांडणाचे हाणामारीत रुपांतर होऊन तलवार काठ्यांनी हाणामारी झाल्यामुळे परस्पर विरोधी गुन्हे शिरुर अनंतपाळ पोलिसात दोन्ही गटाच्या फिर्यादीवरून गुन्हे दाखल झाले आहेत.

पोलीस सुत्राकडून मिळालेल्या माहितीवरून शिरुर अनंतपाळ शहरातील गांधी चौकात दि २० सप्टेंबर रोजी रात्री ९ च्या दरम्यान क्षुल्लक कारणावरुन भांडणाचे हाणामारीत रुपांतर झाले. गांधी चौकात राहणारे दिलीप उर्फ रामलिंग शिवलिंगअप्पा डिगोळे यांना एका भांडणात माझ्या बापाचे नाव का घेतलेस असे विचारत आरोपी सिध्दांत उत्तम गायकवाड यांने त्याला लाथा बुक्याने मारहाण केली. त्यानंतर आरोपी बाळू सुर्यवंशी यांने तलवारीने वार करून डिगोळे याला जबर जखमी केले. तसेच सत्यजित सुर्यवंशी यानेही मारहाण केली. सत्यजित सुर्यवंशी याने फिर्यादीच्या हातातील पाच ग्रामची सोन्याची अंगठी व रोख तीन हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले व फिर्यादीस शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून कांही आरोपींना अटक केली असून कांही आरोपी फरार आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम करीत आहेत.

दरम्यान या घटनेचे पडसाद शहरात उमटले. नागरीकांनी शिरूर अनंतपाळ बाजारपेठ बंद ठेवून फरार आरोपींना अटक करा, असे सांगत बसवेश्वर चौक ते पोलीस ठाण्यापर्यंत काळ्या फिती लावून शहरात मूकमोर्चा काढला. विविध सामाजिक संघटना व शैक्षणिक संस्थांनी आरोपींना अटक करण्याची मागणी केली. त्यानंतर शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. अघोषीत संचारबंदी पुकारुन बाजारपेठ बंद ठेवून नागरीकांनी निषेध व्यक्त केला. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी शिरूर अनंतपाळ पोलिसांसह, राखीव दलातील जवानांना पाचारण करण्यात आले व शांतता कायम ठेवण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या