सांगवी येथील स्मशानभूमीची दुरावस्था, ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष

शिरूर अनंतपाळ तालुक्यातील सांगवी (घुगी) येथील स्मशानभूमी पूर्णपणे जमीनदोस्त झाली असून अंत्यसंस्कारासाठी ग्रामवासीयांना उघड्यावर अंत्यसंस्कार करावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांतून तीव्र असंतोष व्यक्त होत आहे.

ग्रामपंचायतीचे नागरिकांच्या मूलभूत समस्येकडे पूर्णत: दुर्लक्ष होत आहे. ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभारामुळे मृत्यू पश्चातही प्रेतांची हेळसांड होत आहे. वारंवार निवेदने देऊन सुद्धा ग्रामपंचायत प्रशासन या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. स्मशान भूमी कडे जाण्यासाठी सुद्धा रस्ता नाही. पावसाळ्यात चिखल तुडवत जावे लागते. स्मशानभूमी पूर्णपणे जमिनदोस्त झाल्याने नाईलाजाने उघड्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.

स्मशानभूमीचे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे ती स्मशान भूमी जमीनदोस्त होऊन पडली आहे. सुदैवाने यात कुठली जीवितहानी झाली नाही. वारंवार विनंती करूनही ग्रामपंचायत स्तरावर कसल्याही प्रकारची उपाययोजना केली जात नाही. प्रशासन स्तरावर दखल नाही घेतल्यास ग्रामस्थांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावावा. अशी मागणी ग्रामस्थांमधून करण्यात येत आहे.