शिरूर पश्चिम भागात बिबटयांचे हल्ले सुरूच

सामना प्रतिनिधी । कवठे येमाई

शिरुर तालुक्यातील कवठे येमाई परिसरात मागील आठ दिवसांत बिबट्यांनी केलेल्या हल्ल्यात अनेक पाळीव प्राण्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. पाळीव प्राण्यांवर बिबट्याच्या सततच्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये मोठीच भीती पसरली आहे. बिबट्याच्या दहशतीने शेतक-यांना दिवसाही शेतीतील कामे करणे भीतीदायक वाटू लागले आहे.

बुधवारी पहाटे येथील पोकळे वस्तीतील प्रकाश बन्सी पोकळे यांच्या घरानजीकच्या शेतात बांधलेल्या २ कालवाडीवर बिबट्याने हल्ला करून त्यांना ठार मारल्याने या शेतक-याचे सुमारे तीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. बिबट्याच्या हल्ल्याने पाळीव प्राण्यांना नाहक जीव गमवावे लागत असल्याने वन विभागाने बिबटयांच्या बंदोबस्तासाठी युद्धपातळीवर उपाय योजना करण्याची गरज नागरिकांतून व्यक्त होत आहे.

काही दिवसांपूर्वी गांजेवाडी परिसरातील किसन सावंत यांच्या घराच्या टेरेसवर बांधलेल्या शेळ्यांवर हल्ला करीत बिबट्याने दोन शेळ्या ठार केल्या होत्या. तर दुस-याच दिवशी येथील टाव्हरेवस्ती नजीक मेंढ्याच्या तळा जवळून एक घोडी रात्री साडे आठच्या दरम्यान बिबट्याने हल्ला करीत पळवून नेत ठार केली होती. राजेंद्र रामभाऊ गावडे यांच्या शेतात गेल्या एका महिन्यांपासून आपली १०० बकरे, मेंढ्या, २ घोड्या घेऊन वास्तव्य करणारे मुंजाळवाडी येथील मेंढपाळ चंद्रभागा भगवंत हिलाळ यांचा तांडा आहे.

शिरूरचे मुख्य वन अधिकारी तुषार ढमढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक प्रवीण क्षीरसागर यांनी पोकळे वस्तीतील घटनास्थळी सकाळीच भेट देत पंचानामा केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या