श्रिया पिळगावकर म्हणतेय ‘जय माता दी’

सामना ऑनलाईन । मुंबई

अभिनेत्यांची पुढची पिढी चित्रपटसृष्टीत पदार्पण करते, तेव्हा त्यांच्याकडून प्रेक्षकांच्या बऱ्याच अपेक्षा असतात. मराठी चित्रपटसृष्टीतील अशाच एका अभिनेत्याची मुलगी या चित्रपटसृष्टीत स्वत:ची अशी ओळख बनवतेय. ती मुलगी म्हणजे श्रिया पिळगावकर. ‘फॅन’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी श्रिया लवकरच तिच्या आईसोबत म्हणजेच अभिनेत्री सुप्रिया पिळगावकरसोबत लघुपटात दिसणार आहेत.

मातृदिनाच्या निमित्ताने श्रिया-सुप्रिया एका लघुपटासाठी एकत्र काम करणार आहेत. ‘जय माता दी’ असं या विनोदी लघुपटाचं नाव असून
‘टेरिबली टायनी टॉकिज’ या युट्यूब चॅनलवर शनिवारी म्हणजे १३ मे रोजी हा लघुपट प्रदर्शित केला जाणार आहे. नवजोत गुलाटी दिग्दर्शित आणि लिखित या लघुपटामध्ये अभिनेता शिव पंडीतही झळकणार आहे. सुप्रिया आणि श्रिया या लघुपटाबद्दल फारच उत्सुक आहेत.

शाहरुख खानची मुख्य भूमिका असणाऱ्या ‘फॅन’ या चित्रपटातून झळकल्यानंतर श्रिया प्रकाशझोतात आली. याआधी तिने आपल्या वडिलांची म्हणजेच सचिन पिळगावकर यांची निर्मिती असलेल्या ‘एकुलती एक’ या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं.

आपली प्रतिक्रिया द्या