शिशिररंग….. हुरडा पार्टी

<< शेफ नीलेश लिमये >>

हुरडा पार्टी पश्चिम महाराष्ट्राचे खास थंडीतले वैशिष्टय़. आज जागोजागी खास हुरडा पार्टीचे आयोजन केले जाते आणि थंडीचा आस्वाद घेतला जातो हुरडय़ासोबत

थंडी पडायला सुरुवात झाली की वेध लागतात ते हुरडा पार्टीचे… थंडीच्या दिवसात हुरडा खाण्याची मजा काही वेगळीच असते. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात हुरडा खाण्याची प्रथा प्रचलित आहे. आता ती खूपच लोकप्रिय होतेय. अशीच ओढ लागल्यामुळे यंदा तो खायचाच असं ठरवलं… हुरडय़ाची खासियत अशी की शहरातल्या कोणत्याही रेस्टॉरंटमध्ये हुरडय़ाची चव चाखता येत नाही. त्यामुळे या हुरडय़ाची आणि हुरडा पार्टी ही काय भानगड असते ते जाणून घेण्यासाठी माहिती काढली.

पुण्याहून ३० किलोमीटर अंतरावर सासवड जेजुरी मार्गावर बोरकर मळ्यात हुरडा पार्टीचा बेत आखला. या शेतावर गेल्या गेल्या चिंचांनी लगडलेलं झाड दिसलं. त्या चिंचेच्या झाडाखाली मस्त गाय-बैलाची एक जोडी होती. बाजूला गोड वासरू… तिथे एक शेतकरी त्यांना चारा घालत होता. वासराचं निरागस रुप बघूनच आज आपला दिवस काहीतरी वेगळा जाणार याची कल्पना आली. गाडी पार्क केली आणि बैलगाडीतून निघालो… त्यांच्या उसाच्या रसावर ताव मारला. स्वच्छ, ताजा उसाचा रस… तोसुद्धा मशीनवरून काढलेला नाही, तर लाकडामध्ये ऊस ठेचून त्याचा निघालेला रस… फेसाळलेला तो रस होता. त्याच्या फेसामुळे मिशीला लागलेला रंग आरशात पाहून गंमत वाटली. इतर पर्यटकही त्याचा आनंद घेत होते. आता दोन ग्लास उसाचा रस पिऊन हुरडा खायला पोट रिकामं हवं ना… पण शेतात जाण्यासाठी चालत जाताना तो रस कधी विरून गेला कळलंच नाही. शेतात खास सुरती हुरडय़ाची लागवण केली होती. त्याची कणसं अशी काही बहरून आली होती की ती बघूनच डोळ्यांचं पारणं फिटलं. ही कणसं खास हुरडय़ाचीच असतात. भाजून त्यांचा आस्वाद घेण्यासाठीच ती असतात. या हुरडय़ामध्ये दोन-तीन व्हरायटीज आहेत. म्हणजे सुरती हुरडा, गुळ-भेंडी हुरडा आणि उत्तरा हुरडा… हे तीनही प्रकार हुरडय़ासाठीच पिकवले जातात.

भरपेट हुरडा खाऊन झाल्यानंतर कळलं की मळ्यात भरपेट जेवणाचीही तयारी होती. जेवणही साठासंगीत होतं. पूर्णपणे शाकाहारी… त्यात इंद्रायणी तांदळाचा मसालेभात… त्याला चव आली होती ती त्याच शेतात पिकलेल्या मटारची. त्यामुळे भात चविष्ट लागत होता. त्यात मस्त भरली वांगी, गाजराची कोशिंबीर, मटकीची उसळ, ज्वारी व बाजरीच्या ताज्या भाकऱया… त्या बायका गरमगरम भाकऱया करून वाढत होत्या. किती खाल्ल्या त्याची गणतीच नाही. त्यातच तिथली चव अजूनही जिभेवर रेंगाळतेय तो म्हणजे मिरचीचा ठेचा… आपणही तसा करतो, पण तिथल्या ठेच्याची लज्जतच न्यारी…

नेहमीपेक्षा वेगळी पार्टी

हुरडा पार्टी ही आयुष्यात एकदा तरी अनुभव घेण्यासारखी गोष्ट आहे. कारण डीजे असला की आपली पार्टी खऱया अर्थाने रंगते. पण हुरडा पार्टीत तसलं काहीही नसूनही खूप मजा येते. नेहमी पार्टीसाठी असलेला भपकेपणा कुठेच नव्हता… नॉन व्हेज नव्हतं… ड्रिंक्सही नव्हतं… तरीही पार्टीची भन्नाट मजा आली. मस्त वाटली. नाचगाण्यांची कमतरता जाणवली नाही. अतिशय निसर्गरम्य वातावरण आणि गोवऱयांच्या चुलीत भाजल्या गेलेल्या कणसांची चव अप्रतिम होती… त्याला दुसरे शब्दच नाहीत.

ही कणसं हुरडय़ासाठीच!

थोडी विचारपूस केली तेव्हा कळलं की या हुरडय़ाच्या भाकऱया होतात, पण थोडय़ाशा सैलसर होतात. त्याचं पिठ मळतो तेव्हा ते घट्ट होत नाही. त्यामुळे त्याच्या तेवढय़ा चांगल्या भाकऱया बनत नाहीत. पण शेतकरी त्याच्या भाकऱया बनवतात. पण ही कणसं हुरडय़ासाठीच असतात. त्यांचा आस्वाद त्यांच्या कोवळ्या दाण्यांतूनच मिळतो. ही कणसं आम्ही तोडून आणली. शेतातच एक खड्डा केला होता. त्या खड्डय़ात गोवऱया पेटवल्या होत्या. त्या गोवऱयांमध्ये शेतकरी बायका फटाफट हुरडय़ाची कणसं भाजून देत होत्या. भाजून झाली की ती कणसं वरवंटय़ाच्या सहाय्याने पाटय़ावर चुरून घेतली जात होती. चुरलेला हुरडा खाली लावलेल्या सुपामध्ये पडत होता. सुपातून तिथल्या तिथे पाखडून तो आम्हाला दिला जायचा. या हुरडय़ाबरोबर खोबऱयाची ताजी सुकी चटणी, शेंगदाण्याचीही सुकी चटणी आणि त्याच्याबरोबर अतिशय उच्च दर्जाचा गूळ… या तीनही पदार्थांबरोबर हुरडय़ाची जी काय चव लागते… अहाहा!

शेतावरचा अनुभव

हुरडा खायचा तर प्रत्यक्ष शेतावर जाऊनच… हुरडा पार्टी म्हटली की गावाकडची ओढ लागते. तिथलं वातावरण अनुभवण्याचा हा एक चान्स असतो. कारण आपल्या रोजच्या दगदगीच्या जीवनात आपल्याला निसर्ग नेमका काय आहे, कसा आहे याचाच विसर पडतोय. कधीकधी लोणावळ्याला जाऊन पार्टी केली जाते, पण तिथले धबधबे पाहणं, हॉटेलात बसून स्टॉक पार्टी करणं यापेक्षा हुरडा पार्टी नक्कीच निराळी होऊ शकते. याच उद्देश्याने बाहेर पडलो. मुंबईचं वातावरणही सध्या खूप छान आहे. थंडीचे दिवस आहेत.

लज्जत न्यारी…

ज्वारीचे टपोरे दाणे चपटे आणि लुसलुशीत असतात. या हुरडा पार्टीचं वैशिष्टय़ अजून वाढतं ते त्याबरोबर सर्व्ह केलेल्या शेंगदाणा चटणी, खोबऱयाची चटणी आणि गूळ. हुरडा धुऊन घेऊन या चटण्या मिक्स कराव्यात आणि याची लज्जत घ्यावी. निसर्गाच्या सान्निध्यात हिरवागार मखमली गालिचा पसरावा, असं बहरलेलं पीक, त्याचा मधुर सुगंध, बैलांच्या गळय़ात बांधलेले झूल-घंटा याचा छान ठेका धुरकटलेल्या चुलीवर ही ज्वारीची कणसं भाजून खाण्यात एक अलौकिक अनुभव मिळतो.

 

आपली प्रतिक्रिया द्या