मुंबईसह प्रत्येक जिल्ह्यात मिळणार ‘शिवभोजन’ ,शासन निर्णय जारी

1282

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गरीबांसाठी 10 रुपयांत शिवभोजन थाळी देण्याची घोषणा केली. नागपूर अधिवेशनातील या घोषणेनंतर दोनच दिवसांत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकरी कर्जमुक्ती आणि शिवभोजनाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. कर्जमुक्तीपाठोपाठ आता गरीबांना सकस आहार देणाऱया शिवभोजन योजनेचीही सुरुवात होत असून याविषयीचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. यानुसार आता महाराष्ट्रातील प्रत्येक जिह्यात ‘शिवभोजन’ दिले जाणार आहे.

शिवभोजन योजनेला सुरुवात करण्यात येत असून सध्या प्रायोगिक तत्त्वावर प्रत्येक जिह्याच्या मुख्यालयात शिवभोजन दिले जाणार आहे. यानुसार मुंबई शहर आणि उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह विदर्भ, मराठावाडा, पश्चिम महाराष्ट्राच्या प्रत्येक जिह्यातील मुख्यालयात हे शिवभोजन मिळणार आहे. दोन चपात्या, एक वाटी भाजी, 1 मूद भात, एक वाटी वरण असा आहार असणारी शिवथाळी 10 रुपयांत दुपारी 12 ते 2 या वेळेत उपलब्ध करून दिली जाणार आहे. खानावळ, एनजीओ, महिला बचतगट, भोजनालये, रेस्टॉरंट यांना ही योजना राबवता येणार असून यासाठी सरकारकडून अनुदानही दिले जाणार आहे. सध्या प्रायोगिक तत्त्वावर मुंबईत 1950 थाळ्यांचे,  ठाण्यात 1350 थाळ्या, पालघर 450 थाळ्या,नागपूर 750 थाळ्या, पुण्यात 1500 थाळय़ा असे प्रत्येक जिह्यात रोज दुपारचे शिवभोजन उपलब्ध करून दिले जाणार आहे. या योजनेवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा, तालुका, महापालिका स्तरावर एक समिती नेमण्यात येणार असून त्यावर लक्ष ठेवण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या