शिवभोजन थाळीची संख्या 18 हजारांवरून 36 हजार; दररोज दुप्पट लोकांना मिळणार

358

राज्यात शिवभोजन योजनेला मिळणारा जबरदस्त प्रतिसाद आणि वाढती मागणी लक्षात घेऊन दररोजच्या शिवभोजन थाळीची संख्या 18 हजारांवरून 36 हजार करण्यात आली आहे. शिवभोजन थाळी एक लाखापर्यंत नेण्याची महत्त्वाकांक्षी योजना आहे.

शिवभोजन योजनेला भरघोस प्रतिसाद मिळत असल्याने या योजनेचा विस्तार करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अन्न व नागरी पुरवठा विभागाला दिले होते. त्यानुसार रोजच्या शिवभोजन थाळींची संख्या 18 हजारांवरून 36 हजार थाळीपर्यंत केली आहे.

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने यासंबंधीचा शासननिर्णय आज जारी केला आहे. यानुसार सध्या प्रत्येक शिवभोजन केंद्रासाठी असलेले किमान 75 व कमाल 150 थाळींची संख्या वाढवून किमान 75 आणि कमाल 200 थाळी केली आहे.

योजनेला भरघोस प्रतिसाद

राज्यात प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शिवभोजन योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली होती. पहिल्या दिवसापासूनच योजनेला राज्यातील गोरगरीब जनतेने प्रचंड प्रतिसाद दिला.

शिवभोजन केंद्रांना भेट

अन्न व नागरी पुरवठा विभागातील अधिकाऱयांव्यतिरिक्त तहसीलदार, गट विकास अधिकारी तथा समकक्ष अधिकाऱयांमार्फत शिवभोजन केंद्राची भेट व तपासणी करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. या भेटीत शिवभोजन केंद्रावरील स्वच्छता, नीटनेटकेपणा, अन्नाची गुणवत्ता या बाबींकडे लक्ष द्यावयाचे आहे. पहिल्या टप्प्यात केवळ शासकीय कार्यालये, रुग्णालये बस आणि रेल्वे स्थानके, बाजारपेठा यासारख्या सार्वजनिक ठिकाणीच योजना राबविली जात असली तरी भविष्यात या योजनेचा आणखी विस्तार करण्याची योजना आहे.

आपली प्रतिक्रिया द्या