शक्तिस्थळावर लोटणार निष्ठेचा जनसागर! सोमवारी शिवसेनाप्रमुखांचा स्मृतिदिन

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त सोमवार, 17 नोव्हेंबर रोजी शक्तिस्थळावर निष्ठावंतांचा जनसागर लोटणार आहे. हजारो शिवसैनिक आणि शिवप्रेमी शिवसेनाप्रमुखांच्या तसबिरीसमोर नतमस्तक होतील. यासाठी पोलीस, पालिका आणि शिवसेनेकडून चोख व्यवस्थेचे नियोजन करण्यात येत आहे.

मराठी माणसाच्या मनात आत्मसन्मानाचे स्फुल्लिंग चेतवणारे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निर्वाणानंतर त्यांना वंदन करण्यासाठी स्मृतिदिनी दरवर्षी शक्तिस्थळावर हजारोंचा जनसमुदाय येत असतो. यामध्ये शिवसैनिकांसह अनेक पक्षांचे नेते, नागरिकांचा समावेश असतो. यावेळी मोठ्या संख्येने होणाऱ्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी मुंबई पोलीस, पालिका आणि शिवसेनेकडून सुविधा पुरवल्या जातात. या वर्षी 17 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजल्यापासून शक्तिस्थळावर दर्शनास सुरुवात होणार आहे.

शक्तिस्थळावर फुलांची सजावट

शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवतीर्थावर पालिकेच्या माध्यमातून फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. शिवाय हिरवळीचीही डागडुजी करण्यात आली आहे. दरम्यान, सोमवारी होणारी गर्दी पाहता पोलिसांकडून तगडा बंदोबस्तही तैनात करण्यात येणार आहे.